Breaking News

घटस्फोट होता होता पुन्हा जुळल्या गाठी!


नगर (प्रतिनिधी)ः अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांच्यात समजोता होत नव्हता...लहान मुलगा असतानाही एकत्र यायला दोघांचीही तयारी नव्हती...मुलीच्या माहेरच्या दबावाखाली ती होती...घटस्फोटाच्या दाव्याचा युक्तिवाद संपला...न्यायाधीशांच्या सह्या होणार आणि रीतसर घटस्फोट होणार... तेवढ्यात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी त्यांना पुन्हा एकदा दोघांनीच परस्परांशी बोलण्याचा सल्ला दिला. मुलाच्या भविष्याचा विचार करून ते पुन्हा एकत्र आले. त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला. 

नगरमधील एक मुलगा. अतिशय गरीब स्वभावाचा. खासगी कंपनीत नोकरीला. पत्नी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. या दांपत्याला एक मुलगाही झाला. प्रसुतिनंतर पत्नी माहेरीच राहिली. ती परत यायलाच तयार नव्हती. वडिलांना मुलालाही पाहता येईना. पत्नीच्या माहेरच्यांचा जावयालाच सासुरवाडीला येऊन राहण्याचा आग्रह. पतीला मात्र आईवडिलांची सेवा महत्त्वाची वाटली. आईवडिलांनी मुलाला सासरी जाऊन राहायला सांगितलं. दोघांचा संसार वाचावा, असा प्रयत्न होता. अखेर मुलगा पत्नी आणि मुलासाठी सासरी जाऊन राहिला; परंतु तिथंही त्याला त्रास झाला. सासरच्या छळाला कंटाळून तो पुरुष हक्क समितीकडे आला. अ‍ॅड. शिवाजी अण्णा कराळे यांची मुलाने भेट घेतली. मुलगीही न्यायालयात आली. 

न्यायालयाने दोेघांना समुपदेशनासाठी पाठवलं. तीन-चार वर्षांच्या मुलाच्या मानसिकतेचा विचार करून पुन्हा एकत्र या, असा सल्ला दोघांना दिला; परंतु त्यांच्यात गैरसमजच जास्त होते. समुपदेशनातून तोडगा निघत नाही, असे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात आले. दोघांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा दावा केला. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मुलीच्या बाजूने भाऊसाहेब देशमुख यांनी तर मुलाच्या बाजूने अ‍ॅड. कराळे आणि करुणा शिंदे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयानेही निकालाची तारीख दिली. घटस्फोटाचा दावा मंजूर होणार, म्हणून दोघे न्यायालयात आले. शेवटचा प्रयत्न म्हणून दोघांच्या वकिलांनी पुन्हा एकदा दोघांनी स्वतंत्र मध्यस्थाशिवाय चर्चा करण्याचा सल्ला दिला. लहानग्याचा विचार करा, असे सुचविले. दोघे एकत्र बोलले. त्यांनाही आपला निर्णय चुकीचा आहे, हे पटले. घटस्फोट मंजूर करून घेऊन विभक्त राहण्याच्या तयारीने आलेल्या दोघांनी हा सामंजस्य दावाच मागे घेतला आणि ते एकत्र राहण्यासाठी गेले. दोघांचा संसार तुटता तुटता वाचला.