अन्यथा भाजपचे खासदार निवडून आणू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला इशारा


पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेनेने मोदींना पाठिंबा दिला नाही तर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार निवडून आणू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. शिवसेनेने भाजपसोबत लोकसभेला युती केल्यास मावळ व शिरूर या दोन्ही जागा शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना सोडण्यात येतील, असेही त्यांनी अप्रत्यक्षित सूचित केले. निगडी, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिलीप कांबळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आमदार चंद्रकांत हाळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचार्णे, योगेश टिळेकर, खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीने एका व्यासपीठावर यावे. त्यांचे 15 वर्षांचे राजकारण आणि आमची 4 वर्षांची सत्ता. या 4 वर्षांत आम्ही उजवे ठरलो नाहीत, तर आगामी निवडणुकांना सामोरे जाणार नाही, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले. मावळ आणि शिरूरसाठी मदनलाल धिंग्रा मैदानावर कोणाच्या विरोधात भाजपने सभा घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी कोण आहे, हे समजण्यासाठी ही सभा आहे. मावळ आणि शिरूरमध्ये सभा घेतोय याचा अर्थ युती संपली का? असा प्रश्‍न काहींना पडला आहे. या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडूण आणण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. 2014 मध्ये मोदी लाट होती म्हणून खासदार निवडून आणले म्हणणार्‍यांना 2019 मध्ये आम्ही सुनामी आणण्यासाठीच ही सभा घेतली आहे. मोदींना पंतप्रधान करणे ही देशाची आवश्यकता आहे. त्यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला हवे आहे. त्यामुळे त्यांना जे पाठिंबा देतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असेच खासदार निवडूण आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

काँगे्रस-राष्ट्रवादीला सवाल 


भाजपने शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीचे 50 हजार कोटी रुपये जमा केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने 8 हजार कोटी दिले होते. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सिंचनाच्या नावावर स्वतःची घरे आणि तिजोरी भरली. भाजप सरकारने शेतकर्‍यांना एफआरपी मिळवून दिला. रस्ते आणि सिंचन क्षेत्रात सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले. तुम्ही तिजोर्‍या भरण्यासाठी जनतेचे पैसे लाटले आणि आम्हाला विचारता तुम्ही काय केले? असा सवाल त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला.

अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक : दानवे 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर सडकून टीका केली. दानवे म्हणाले, अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यात 70 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पोलीस अजित पवारांच्या दारापर्यंत पोहचले आहेत. आता अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget