Breaking News

जलसंधारणाच्या जनजागृतीस उत्तेजन देण्यार्‍यास पुरस्कार


बुलडाणा,(प्रतिनिधी): जल संसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीने विविध छापील माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सामाजिक माध्यमातून जलसंधारण संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात जनजागृतीस उत्तेजन देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जल पारितोषिकाची घोषणा केलेली आहे. या राष्ट्रीय जल पारितोषिका मध्ये उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट नगरपालिका, उत्कृष्ट पंचायत समिती, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट गाव, उत्कृष्ट शाळा, उत्कृष्ट टीव्ही दूरचित्रवाहिनी, उत्कृष्ट वर्तमानपत्र इत्यादींना पुरस्कार मिळणार आहेत. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही मानवाची मूलभूत गरज असलेले पाणी व पिण्यायोग्य पाण्याची टंचाई भासत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जल पारीतोषिकाची घोषणा केलेली आहे. 

राष्ट्रीय जल पारितोषिक पुरस्कार हे उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट गाव, उत्कृष्ट नगरपालिका, उत्कृष्ट पंचायत समिती, उत्कृष्ट नावीन्यपूर्ण संशोधन, उत्कृष्ट वृत्तवाहिनी, उत्कृष्ट टीव्ही शो तसेच वर्तमानपत्र हिंदी व इंग्रजी, उत्कृष्ट शाळा, उत्कृष्ट संस्था उत्कृष्ट औद्योगिक संस्था इत्यादींना मिळणार आहे. यामध्ये राज्य स्तर आणि जिल्हास्तर वगळता उर्वरित सर्वांना सन्मानचिन्ह आणि प्रथम बक्षीस रोख रक्कम रुपये दोन लक्ष, द्वितीय बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लक्ष आणि तृतीय बक्षीस रक्कम रुपये एक लक्ष असे असणार आहे. तर टीव्ही शो, वृत्तपत्र हिंदी व मराठी यांना प्रथम बक्षीस रुपये दोन लक्ष आणि द्वितीय बक्षीस रुपये दीड लक्ष असे असणार आहे. या नावीन्यपूर्ण अभियानामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक मिळवावा आणि जल संवर्धनासाठी हातभार लावावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष उमाताई शिवचंद्र तायडे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस यांनी केले आहे.