Breaking News

ऐन दिवाळीत सहा घूंगरूचा परवाना रद्द


जामखेड/प्रतिनिधी जामखेड येथील सहा कलाकेद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकार्‍यांनी तहसीलदार यांना दिले आहेत. या आदेशामुळे कलाकेंद्रचालकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचा मेल आल्याबरोबर तात्काळ त्या आदेशाचे पत्र संबंधित सहा कलाकेंद्रांना दि 5 नोव्हें रोजी दिले. मात्र काही कलाकेंद्रचालकांनी पत्र घेण्यास नकार दिल्याने परवाना रद्द करण्याच्या आदेशाचे पत्र त्या कलाकेंद्राच्या दर्शनीभागावर चिकटवले आहेत. असे तहसील प्रशासनाने सांगितले.

 जिल्हा प्रशासनाने जामखेड मधील जगदंबा कला केंद्र, झंकार संगित पार्टी (दिवाणखाना), नटराज संगित बारी (दिवाणखाना), घुंगरू सांस्कृतिक कला केंद्र, पवार रेणूका सांस्कृतिक कला केंद्र, लक्ष्मी कला केंद्र या सहा वादग्रस्त कला केंद्रांचा परवाना रद्द करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. सदर कलाकेंद्रांना परवाना देण्याचा अधिकार 2006 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले असतांना जामखेड तहसिलने या कलाकेंद्रांना परवाना कसा दिला यावर जिल्हा प्रशासनाने आक्षेप घेत तहसीलने दिलेले परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. अवैध धंद्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप करीत कला केंद्र बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तहसील कार्यालयाने कारवाई करू असे आश्‍वासन देऊनही पूढे काहीच केले नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने कला केंद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेल्या, अवैध धंदयांचे अड्डे तसेच गून्हेगारांना आश्रय देत असल्याचे आरोप जामखेड येथील कलाकेंद्रांवर होत आहेत. जामखेड चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. जिल्ह्यात गुन्हे करून गून्हेगार जामखेडला कलाकेंद्रांवर अश्रयास येतात. मात्र काही कलाकेंद्रचालकांचा शासकीय, राजकीय स्तरावरील उच्च पदस्थांबरोबरचा वावर अशा वादावर पडदा टाकण्याचे काम करत आहे.