Breaking News

योगा व बुध्दीबळाला प्राचीन परंपरा -माजी आ.सानंदायोगाचार्य गिरधारीलालजी पुरवार यांचा जाहिर नागरी सत्कार खामगांव,(प्रतिनिधी): सामाजिक कार्याची आवड असली की, ना परिस्थिती आड येते ना वय, हे गिरधारीलाल पुरवार यांच्याकडे पाहून लक्षात येते. क्रिडा क्षेत्राच्या माध्यमातुन लोकांची सेवा करण्यात धन्यता मानणारे योगाचार्य गिरधारीलाल पुरवार यांनी उत्कृष्ट कबड्डी पटू, कुस्तीगीर व बुध्दीबळ खेळाडू घडविले आहेत. योगा व बुध्दीबळाला प्राचीन परंपरा आहे. त्यात विश्‍व सामावलेले आहे ते आपण जपले पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

योगानुरागी शक्तीउपासक शिवाजी व्यायाम मंदीराचे माजी अध्यक्ष गिरधारीलालजी पुरवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सानंदा यांनी व्यक्त करुन योग गुरु गिरधारीलालजी पुरवार व छत्रपती पुरस्कार प्राप्त विरप्रताप बाबुजी थानवी यांना वाढदिवसानिमित्त शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. 5 नोव्हे. रोजी देवजी खिमजी मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंचावर सत्कारमुर्ती योगाचार्य गिरधारीलाल पुरवार, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त विरप्रताप बाबुजी थानवी, टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा योगा असो. जिल्हाध्यक्ष पी. आर. उपर्वट सर, माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, अंजली गुलजार गवली यांची प्रमुख उपस्थिती होती. सानंदा म्हणाले की, ज्ञानयोग भक्तीयोग व कर्मयोग यामुळे जीवनात हर्षयोग येतो. सहकुटूंब पुरवार परिवाराने योगाचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे केला व सुदृढ़ समाज निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याबद्दल खामगांव नगर वासियांना सार्थ अभिमान आहे. योगामुळे ईश्‍वरी नाते जुळते हे नाते अधिक दृढ़ होवो यासाठी नियमित योग साधना करावी असे आवाहन ही सानंदा यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना योगाचार्य गिरधारीलालजी पुरवार म्हणाले की, माझे वडील त्र्यंबक पुरवार शिवाजी व्यायाम मंदीराचे संस्थापक अध्यक्ष होते त्यानंतर मला सुध्दा शिवाजी व्यायाम मंदीराचे अध्यक्षपदाची मान मिळाला. माझ्यानंतर राणा गोकुलसिंह सानंदा यांनी शिवाजी व्यायाम मंदीराची अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून त्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील स्पर्धा घेऊन अनेक चांगले कुस्तीपटु व कबड्डीपटू निर्माण केले.

शिवाजी व्यायाम मंदीराच्या अनेक उदयोन्मुख खेळाडू घडविण्याचे लोकाभिमुख कार्य करणााया श्री शिवाजी व्यायाम शाळेला गलिच्छ राजकारणापोटी सील लावून तरुणांना वंचित ठेवल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येकाने योग अवश्य करावा योगाचे अनेक फायदे आहेत, योगामुळे आरोग्य सुदृढ़ बनते व शरीर निरोगी राहते. तरुणांनी नियमित व्यायाम करावा व देश हितासाठी, विधायक कार्यासाठी आपली शक्ती वापरावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे. असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या काळापासून क्रिडा कौशल्याला विशेष वाव होता. गिरधारीलालजी पुरवार, छत्रपती पुरस्कार प्राप्त बाबुजी थानवी व बुलडाणा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गोकुलसिंहजी सानंदा यांनी तन-मन-धनाने सहकार्य करुन अनेक कबड्डी पटू, कुस्ती पटू घडविल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी जिल्हास्तरीय योग व चेस स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अ‍ॅड. अनिल व्यास यांनी तर आभार प्रर्दशन महावीर थानवी यांनी केले.