Breaking News

मिझोराममध्य काँग्रेसला आणखी एक धक्का


ऐझवाल: ईशान्येकडील सात राज्यांपैकी मिझोराम येथेच फक्त आता काँग्रेसची सत्ता आहे; मात्र या राज्यात 28 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसला अनेक धक्के बसू लागले आहेत. सप्टेंबरपासून आतापर्यंत काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले आहेत. अन्य तीन राज्यांत चांगली कामगिरी करण्याची एपक्षा असलेल्या काँग्रेसला येथील सत्ता मात्र गमवावी लागण्याची शक्यता आहे. 

मिझोराममध्ये गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. मुख्यमंत्री लालथानहावला यांच्याविरोधात काँग्रेसच्याच नेत्यांनी बंड पुाकारले आहे. तिथे भाजपला गौण स्थान होते; परंतु आता विधानसभेचे सभापती हिपेई यांनी आपल्या पदाचा तसेच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

हिपेई हे काँग्रेसच्या तिकीटावर सातवेळा निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपसभापती आर. लालरीनावमा यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो स्वीकारला आहे. 40 जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेसचा राजीनामा देणारे हिपेई हे पाचवे आमदार आहेत. हिपेई हे जेष्ठ नेते आहेत. ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे भाजपला मजबुती मिळेल, अशी आशा भाजप नेते हिमांता विश्‍व शर्मा यांनी म्हटले आहे. हिपेई हे 2014 पासून पलक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी 1972 ते 1989 दरम्यान तुईपांग येथून सहावेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. स्थानिक मिझो नॅशनल फ्रंटला या वेळी चांगले यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.