Breaking News

अग्रलेख : भाजपच्या मंत्र्यांतला अवनी कलगीतुरा!

यवतमाळ जिल्ह्यातल्या अवनी या वाघिणीला ठार मारल्यावरून केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी व राज्याचे वनमंत्र सुधीर मुनगंटीवार यांच्यातला कलगीतुरा जनतेची करमणूक करीत असला, तरी वनविभागाची माहिती घेतली, तर अवनीला मारण्यासाठी घाई करण्यात आली आणि त्यासाठी काही नियमही पायदळी तुडविण्यात आले, हे स्पष्ट होत आहे. जंगली श्‍वापदे कधीही आपला नियम मोडत नाहीत. मानवानेच त्यांच्या अधिकारावर आक्रमण केल्याने त्यांना आपले जंगल सोडून मानवी वस्तीत यावे लागले आहे. आता शहरात बिबट्या दिसायला लागले आहेत. त्याचे कारण त्यांना जंगलात खाद्य राहिले नाही. जंगले आकसत गेली. अवनीचेही तसेच झाले. तिला नरभक्षक व्हायला मानवानेच भाग पाडले. वनविभागा किती बेफिकिरीने वागतो, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. अवनीने 13 जणांचा बळी घेतला. त्यामुळे तिला पकडणे आवश्यकच होते. त्याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घेऊन अवनीला ठार मारल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला असेल आणि वनविभागाचा दावा वेगळाच असेल, तर कोठेतरी पाणी मुरते आहे, असे मानायला जागा आहे. अवनी वाघिणीला वनविभागाने ठार केल्यानंतर राज्य सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. मनेका गांधी यांनी त्यांच्याच पक्षाच्या वनमंत्र्यांवर टीका केली आहे. ही हत्या गुन्हाच असून हे प्रकरण आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेणार आहोत असे त्यांनी सांगितले. आता फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मनेका यांनी केलेले आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळले आहेत. अवनी वाघिणीला वन विभागाने नाही, तर एका खासगी शूटरने मारले आहे. याचाच अर्थ एका राष्ट्रीय प्राण्याला मारण्यासाठी खासगी माणसाला बोलवणे हा मूर्खपणा आहे. या माणसाविरोधात गंभीर आरोप आहेत. त्याच्यावर वन विभागाच्या महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, हैदराबादमध्ये एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच त्याचा बंदुक तस्करीत सहभाग असल्याचा आरोप आहे. मनेका गांधी यांनी केलेल्या आरोपाबाबत मात्र मुनगंटीवार यांनीही काहीही स्पष्ट केलेले नाही. प्राण्यांबाबत जराही संवेदनशीलता नसल्याकडे मनेका गांधी यांनी लक्ष वेधले.
वनविभागाची टीम दोन महिने अवनी वाघिणीच्या मागावर होती. जेव्हा ती सापडली, तेव्हा तिला डार्ट मारण्यात आले; पण तरीदेखील ती बेशुद्ध झाली नाही. वनविभागाच्या कर्मचार्‍यावर ती हल्ला करणार होती. त्यात आणखी एक जीव जाऊ शकला असता. बचाव म्हणून कर्मचार्‍यांनी तिला ठार केले, असे मुनगंटीवार सांगतात; परंतु तिला वन विभागाचे म्हणणे वेगळे आहे. शाफत अली खान हे त्या घटनेच्या वेळी तिथे नव्हते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वनविभागाचे नाव बदलून शिकार मंत्रालय ठेवा, अशी टीका केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर वाघिणीला मारण्यात आले, असे सरकार सांगत आहे. अवनीला पकडण्यात नवाब याने वन विभागासमोर उभ्या केलेल्या अडथळ्यांचा पाढाच वन अधिकार्‍याने पाठवलेल्या पत्रात वाचण्यात आला. याआधीही अवनी सहज सापडली असती; परंतु तिच्याबाबतची माहिती नवाब याने लपवल्याने तिला पकडता आले नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. अवनीला ठार करायचे, असे नवाबने ठरवले होते; मात्र सतर्कतेमुळे त्या वेळी अवनीचा जीव वाचला होता. 19 सप्टेंबरला अवनी सहजपणे वन अधिकार्‍यांकडून जेरबंद झाली असती; परंतु प्राण्यांची शिकार करण्याचा विडा उचललेल्या शिकारी नवाब शफाअतअली खानच्या घाईमुळेच अवनीला जिवंत पकडता आले नाही. अवनीने 18 सप्टेंबरला गाईची शिकार केली होती. त्याची माहिती मिळताच वन विभागाची पाच पथके अवनीला पकडण्याच्या तयारीला लागली. गाईची शिकार झालेल्या ठिकाणी दोन पशुवैद्यकीय अधिकारी अवनीला बेशुद्ध करण्यासाठी पोचले; मात्र सायंकाळपर्यंत अवनी शिकारजवळ आली नाही. वन विभागाच्या नियमाप्रमाणे सायंकाळनंतर जनावराला बेशुद्ध केले किंवा मारले जात नाही. या नियमाचे पालन करत 18 सप्टेंबरला वन अधिकार्‍यांनी अवनीला रात्रीचे पकडणे टाळले. या भागापासून नवाबचे पथक लांब राहणार होते. अवनी शिकार खाण्यासाठी आल्यानंतर सकाळ होताच तिला बेशुद्ध करून पकडण्याची वन विभागाची योजना होती. त्यानुसार नवाबची गाडी मुख्य रस्त्यावर थांबेल, शिकारीजवळ जाणार नाही असे ठरले होते; परंतु अवनीला पकडण्याचे श्रेय मिळवण्यासाठी नबावने गाडी शिकारीच्या समोरच नेऊन उभी केली. पथकाची चाहुल लागल्यामुळे अवनी तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. या घटनेने संतापलेल्या पांढरकवडा विभागाच्या उपवनसंरक्षक के. एम. अभर्णा यांनी याबाबतची तक्रार यवतमाळ प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. जी. राहुरकर यांना 20 सप्टेंबर रोजी केली
गांधी यांनी ट्विटरवरून महाराष्ट्राच्या वन्यमंत्र्यांना खडसावल्यानंतर मुनगंटीवार यांनी त्यांना चोख उत्तर दिले. गांधी यांनी जाहीरपणे भाष्य करण्यापूर्वी मला पन्नास पैसे खर्च करून फोनवरून माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे म्हणणे त्यांनी मांडले. ते योग्य असले, तरी मुनगंटीवार यांनीही जाहीरपणे मनेका यांच्यावर टीका करून आपणही त्याच मार्गाने जात आहोत, हे दाखवून दिले. अवनी ही वनकर्मचार्‍यांची शत्रू नाही, तिला ठार मारण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता, असे सांगतानाच या प्रकरणाची मनेका यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करावी, असे थेट आव्हान दिले. दोन्ही मंत्र्यातला वाद हा आता व्यक्तिगत पातळीवर गेला असून त्याला केंद्र विरुद्ध राज्य असे स्वरुप आले आहे. माझ्या कार्यकाळात मी कधीही वाघाला मारण्याचे आदेश दिलेले नाहीत. 2017 मध्ये एका वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले होते, असे सांगत मंत्री किंवा सचिवाला वाघाला मारण्याचे आदेश देण्याचा अधिकार नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मनेका यांच्या पिलिभीत मतदारसंघातील एका नरभक्षक वाघिणीला शार्पशूटर शफाअत अली खान यांनीच गोळ्या घालून ठार केले, तेव्हा तेथील वन विभागाने शफाअत अली खान यांचे प्रमाणपत्र पाठवून अभिनंदन केले होते, याची आठवण मुनगंटीवर यांनी करून दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. मनेका यांच्यावर फोन न करता टीका केल्याबद्दल त्यांना दोष देणारे मुनगंटीवार यांनी ही मनेका यांना फोन न करता टीका करून असमंजसपणाच दाखविला आहे.