Breaking News

परवानाधारक ऑटोरिक्षा चालक-मालकांचा मोर्चा


बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनाही त्याची झळ बसू लागली असुन त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने लक्ष घालून मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी बीड जिल्हा परमिट मालक-चालक ऑटोरिक्षा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल दुपारी मोर्चा काढण्यात आला होता. बीड शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तीन वेळा ऍटोरिक्षा थांबेकरिता आदेश देवूनही थांबे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

या प्रश्‍नी स्वत: लक्ष घालून थांबे देण्यात यावेत, ऍटोरिक्षा पासिंगकरिता बीडमध्ये ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा, बसस्थानका जवळ परवानाधारक रिक्षांकरिता दोनशे मीटरपर्यंत नो पार्किंग नसावी, दुष्काळी परिस्थितीमुळे परवानाधारक रिक्षाला कलम २८३ मध्ये होणार्‍या कार्यवाहीत तडजोड करण्यात यावी, रिक्षाचा विमा शासनामार्फत भरण्यात यावा, रिक्षा चालकांना शासनाने मदत करावी, शहरातील रस्त्यावर असलेले खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश द्यावेत, रिक्षावरील कर्ज माफ करावे, रिक्षा चालकांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी, नवीन परवाना शुल्क कमी करण्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.