Breaking News

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी

नगर । प्रतिनिधी -
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा व वेळेवर उपचार न मिळाल्याने आतापर्यंत अनेकांचे बळी गेले असताना जिल्हा रुग्णालयात योग्य उपचाराअभावी काल (शुक्रवार) आणखी एक अल्पवयीन मुलगी दगावली आहे. इशिका दीपक लोणारे (वय 15, रा. आदर्श गौतमनगर, रेल्वेस्टेशन, नगर) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे.

इशिकाला काल (शुक्रवार) दुपारी अशक्तपणा आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालच रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच इशिका दगावल्याचा आरोप करत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी रात्री 10 वाजता जिल्हा रुग्णालयाच्या गेटवरच ठिय्या दिला.

या आंदोलनात इशिकाच्या नातेवाईकांसह नीलेश भांगरे, मयूर भांगरे, दीपक लोणारे, रोहित घोरपडे, अन्सार शेख, अभय रणदिवे, धनंजय चव्हाण, राजू परदेशी, कृष्णा पेटारे, योगेश इंगळे, ज्ञानेश्वर गारूडकर, यशवंत बदलावाले आदी सहभागी झाले होते. यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे एपीआय गवळी हे घटनास्थळी आले. त्यांनी पीएम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. इशिकाचे वडिल दीपक मनोहर लोणारे (वय 38, रा. रेल्वे स्टेशन) यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.