Breaking News

नगर, धुळ्यात नऊ डिसेंबरला मतदान आचारसंहिता लागू; मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होणार नाही


मुंबईः नगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मतमोजणी 10 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे. दरम्यान, तीन तारखेला मुख्यमंत्र्यांना नगरमध्ये आणून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा भाजपचा हेतू आता विफल ठरला आहे.

नगर महानगरपालिकेची मुदत 9 डिसेंबरला संपते आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत.
 
धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबरला संपते आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 20 जागा राखीव असणार आहेत, अशी घोषणा सहारिया यांनी केली आहे.
या दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. 

निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा

- नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : 13 ते 20 नोव्हेंबर 2018

- नामनिर्देशनपत्रांची छाननी : 22 नोव्हेंबर 2018

- उमेदवारी मागे घेणे : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत

- निवडणूक चिन्ह वाटप : 27 नोव्हेंबर 2018

- मतदान : 9 डिसेंबर 2018

- मतमोजणी : 10 डिसेंबर 2018

- निकालाची राजपत्रात प्रसिद्धी : 13 डिसेंबर 2018 पर्यंत