Breaking News

बाबासाहेबांच्या प्राथमिक शाळेचे स्मारक व्हावे; भीमराव आंबेडकर; डॉ. आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा


सातारा (प्रतिनिधी) : जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ, थोर तत्वज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले, ती प्रतापसिंह हायस्कूल ही शाळा शासनाने संरक्षित स्मारक म्हणून जतन करावी, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली.

येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व समाज कल्याण विभागाच्या तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय जीवन ज्या शाळेतून सुरू झाले, त्या शाळेत येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे. या शाळेत पाऊल टाकताना आपण थोडे भावूक झालो. डॉ. आंबेडकर यांनी ज्या-ज्या ठिकाणी शिक्षण घेतले, त्या परदेशातील ऑक्सफर्ड, केंब्रीज या विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या बॉर्न युनिर्व्हसिटीत शिक्षण घेण्यासाठी अर्ज केला होता, त्या युनिर्व्हसिटीने त्यांचा तो अर्ज आजही जतन करून ठेवला आहे. त्यांचा अर्धपुतळाही उभारला आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांचे तसेच त्यांच्या प्रबंधांचे खास दालन उभे करून त्यांनी या महामानवाला अनोखी श्रद्धांजली वाहिली.

बाबासाहेबांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी मदत करणारे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे बाबासाहेबांनी काही दिवस नोकरी केली. सध्या गायकवाड यांच्या वाड्यातील ती जागा संरक्षित करण्यात आली आहे. बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसून लिहित ती खुर्ची आणि टेबल त्याठिकाणी जपून ठेवले असल्याची आठवण भीमराव यांनी या वेळी सांगितली. डॉ. बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत व बहिष्कृत या वर्तमानपत्राच्या मूळ प्रती सध्या अस्तित्वात नाहीत. त्या मिळवून शासनाने एक खास दालन उभे करावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश यशवंत चावरे यांचे या वेळी भाषण झाले. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शासनाने डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभारावा व त्यांच्या नावाने एक ग्रंथालय उभे करावे, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या सातार्‍यातील वास्तव्यातील काही घटनांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी, जिल्हा परिषदेच्यावतीने या शाळेत डॉ. बाबासाहेबांचा पुतळा आणि सुसज्ज ग्रंथालयही उभारण्याची घोषणा केली.
या वेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश क्षीरसागर, शाळेच्या मुख्याध्यापक शबनम मुजावर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, ज्येष्ठ लेखक पार्थ पोळके, रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी नगरसेवक व क्रांती थिएटर्स अध्यक्ष अमर गायकवाड, वामन मस्के आदी उपस्थित होते.

बाबासाहेंबावर नॉर्वेत पीएच. डी.

नॉर्वेसारख्या छोट्या देशातील एकजण डॉ. बाबासाहेबांवर पीएचडी करतो आणि त्यासाठी भारताला भेट देतो ही मोठी घटना आहे. बाबासाहेबांप्रती त्याची व्यक्तिपूजा नव्हे, तर ज्ञानाची पूजा होती असेही भीमरावांनी नमूद केले.