Breaking News

विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल; दोघांवर गुन्हा


बीड, (प्रतिनिधी): विवाहित महिलेचा सतत पाठलाग करुन एक दिवस तिच्या घरात घुसत अश्लिल फोटो काढून ते समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याची घटना शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी अभियंता तरुणासह अन्य एकाला पोलिसांनी जेरबंद केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर ठाणे हद्दीत राहणार्‍या २९ वर्षीय विवाहित महिलेला दोन मुली आहेत. तिचा पती लाईट फिटींगची कामे करतो. पीडित विवाहिता एम. ए. द्वितीय वर्षात शिकते. १४ एप्रिल २०१८ रोजी विवाहितेच्या मैत्रिणीने तिची ओळख सिद्दीकी शादाब शहाबुद्दीन (रा. शहेंशाहनगर, बीड) याच्याशी करुन दिली. तो अभियंता आहे. ओळख झाल्यानंतर महाविद्यालयातून ये-जा करताना तो पीडित विवाहितेचा पाठलाग करत असे. १४ ऑगस्ट २०१८ रोजी पती बाहेर गेल्याची संधी साधून सिद्दीकी शादाब तिच्या घरात घुसला. यावेळी ती अंघोळ करत होती. त्याने तिला कळू न देता मोबाइलमध्ये तिचे नग्न फोटो काढले. त्यानंतर तिला फोटो दाखवून ’माझ्याशी बोल’ असे सांगितले. त्यासाठी त्याने बशीर मकसूद पठाण (रा. संभाजीनगर) याच्यामार्फत तिला मोबाइल पाठवून दिला. त्यावर तो तिच्याशी संवाद साधत असे. २१ ऑक्टोबर रोजी पत्नीचे अश्लिल फोटो पतीच्या मोबाईलवर एका नातेवाईकाने पाठवले. पतीने पत्नीला याबाबत विचारल्यानंतर तिने सिद्दीकी सादाब याच्या कारनाम्याची माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. फौजदार रफीयोद्दीन शेख तपास करत आहेत.

फोनवर बोलण्यासाठी ब्लॅकमेलिंग : अभियंता असलेल्या सिद्दीकी सादाब याने पीडित विवाहितेचे अश्लिल फोटो काढून तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. ’तू मला आवडते, माझ्याशी बोलत रहा’ असे सांगून त्याने पतीला जिवे मारण्याची व दोन मुलींसोबत गैरकृत्य करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नाईलाजास्तव पीडित विवाहिता त्याच्याशी मोबाइलवर चॅटींग करत होती. मात्र, पतीच्या मोबाइलवर तिचे अश्लिल छायाचित्र आले अन् प्रकरणाचा उलगडा झाल्याचे फौजदार रफीयोद्दीन शेख यांनी सांगितले.