Breaking News

दिवाळी सुट्टीत माजी विद्यार्थी देणार जुन्या आठवणींना उजाळा


कुळधरण/प्रतिनिधी
दिवाळी सुट्टीचे औचित्य साधत कर्जत तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातून माजी विद्यार्थी शिक्षकांसमवेत जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. कर्जतच्या महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रा. सुधाकर खेतमाळस, प्रा. सखाराम राजळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनीही मेळाव्याचे आयोजन केले आहे. 11 नोव्हेंबर रोजी खेड येथे मेळावा होत असून 2001 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 13 नोव्हेंबरला भिगवण येथे दुपारी तीन वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रा.चंद्रकांत चेडे यांच्या अध्यक्षतेखाली हे मेळावे संपन्न होणार आहेत. मेळाव्याला सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार असून माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी सुनील शेटे यांनी केले आहे.