Breaking News

बुलडाण्यातील डेंग्यूचा प्रश्‍न विधानसभेत गाजला आ.सपकाळ यांची लक्षवेधी सुचना, पालिका दोषी आढळल्यास कारवाई


बुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा शहरात डेंग्यूच्या आजारामुळे झालेला मृत्यू व मोठ्या प्रमाणावरील प्रादूर्भावास दोषी असणार्‍या पालिके विरुध्द वेळप्रसंगी फौजदारी कारवाई केल्या जाईल अशी भूमिका राज्याचे आरोग्य मंत्री ना. डॉ. दिपक सावंत यांनी विधानसभेत घेतली. दरम्यान बुधवारी दुपारी विधीमंडळ दालनात आरोग्य मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीस आ. हर्षवर्धन सपकाळ यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे सर्व संबंधीत अधिकारी व बुलडाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही अद्यावत माहितीसह पाचारण करण्यात आले आहे.त्यामुळे पालिकेसह आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांचा ‘ताप’ वाढला आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ व अन्य विधानसभा सदस्यांनी डेंग्यू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर मांडलेल्या लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात आरोग्य मंत्र्यांनी ही घोषण केली.

बुलडाणा शहरात गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प पडलेल्या शहर स्वच्छतेच्या कामामुळे तसेच कृत्रीम पाणी टंचाईमुळे डेंग्यू सदृष्य रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेंग्यूमुळे रूग्णाचा मृत्यू झाला असून शेकडो रूग्ण डेंग्यू बाधीत आहे. जिल्ह्यात सुध्दा अनेक ठिकाणी डेंग्यूचा प्रादूर्भाव निदर्शनास येत आहे. तथापी नगर परिषद प्रशासन व शासकीय आरोग्य विभागाकडील वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे सदर विषयाबाबत ठोस उपाययोजना दिसुन येत नाहीत. त्या अनुषंगाने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षवेधी सुचनेव्दारे बुलडाणा शहरातील स्व्च्छतेविषयी नगर परिषदेचे निर्ढावलेपण, कृत्रीम पाणी टंचाईमुळे घरात पाणी साठवून ठेवण्याची नागरिकांना असलेली अपरिहार्यता व परिणामी नागरिकांच्या जीवीताबाबत निर्माण झालेली असुरक्षितता हे मुद्दे आक्रमकपणे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर सातत्याने सभागृह तहकुब होत असतांना सुध्दा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी या लक्षवेधीवर सभागृहात तब्बल अर्धातास चर्चा घडवून आणली. आ. सपकाळांच्या आक्रमक भुमिकेमुळे सभागृहात शाब्दिक चकमक झाली. मात्र इतर आमदारांनी सुध्दा चर्चेत सहभागी होऊन त्यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला. सदर लक्षवेधीच्या उत्तरात आरोग्य मंत्री ना. डॉ. दिपक सावंत म्हणाले की, राज्य शासनाने डेंग्यू आजाराचा समावेश हा अधिसुचित आजारांच्या यादीत केलेला आहे. त्या अनुषंगाने जोखीम लक्षात घेता करावायाच्या उपाययोजनांबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सुध्दा निर्देश देण्यात आलेले आहे. इतःप्परही बुलडाणा नगर परिषदेकडून गांभीर्यपूर्वक कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत असेल तर निश्‍चितच आरोग्य विभागाकडून नगर परिषद प्रशासनाविरूध्द फौजदारी कारवाई केल्या जाईल, अशी भुमिका जाहीर केली. तसेच नागरी सुरक्षीतेच्या पुढे कोणाचीही हयगय केल्या जाणार नाही, अशी ग्वाही दिली. यासाठी नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक तातडीने घेण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. दरम्यान सदर लक्षवेधीच्या अनुषंगाने आरोग्य मंत्री ना. डॉ. दिपक सावंत यांनी बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी विधीमंडळ दालनात तातडीची बैठक बोलावीली असून या बैठकीस आ. हर्षवर्धन सपकाळ यांना सुध्दा निमंत्रीत करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, संचालक, सहसंचालक, बुलडण्याचे जिल्हा शल्य् चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व बुलडाणा नगर परिषदेचे मुख्याधिकार्‍यांना सुध्दा सर्व अद्यावत माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.