Breaking News

काळे सत्कर्मामुळे उद्योगात विकासाचा सुगंध ः योगीराज महाराज


कोपरगाव/प्रतिनिधी 
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचितांना, शोषितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सत्कर्म केले आहे. साहेबांची साधी राहणी, स्वतासाठी काही करायचं नाही जे काही करायचं ते या समाजासाठीच करायचे. अशा उद्दात्त विचारातून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी केलेल्या सत्कर्मामुळे कारखाना उद्योग समुहात विकासाचा सुगंध दरवळत असल्याचे प्रतिपादन शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज व एकनाथ महाराज संस्थान श्री. क्षेत्र पैठणचे अध्यक्ष प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. योगीराज महाराज पैठणकर यांनी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या सहाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तन सेवेप्रसंगी केले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या सहाव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नुकताच कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे पार पडला. यावेळी कीर्तनरुपी सेवेप्रसंगी बोलतांना ह.भ.प. श्री. योगीराज महाराज पैठणकर म्हणाले की, माजी खासदार शंकररावजी काळे साहेब यांच्याकडे व्यापक दृष्टीकोन होता. समाजात कर्तुत्ववान व्यक्तींचेच पुतळे उभारले जातात व अशा व्यक्तींची कीर्ती अजरामर होते. अशा व्यक्तीपैकी एक व्यक्ति म्हणजेच कर्मवीर शंकररावजी काळे आहेत. त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा त्यांचे पुत्र माजी आ.अशोकराव काळे यांनी समर्थपणे पुढे चालविला. आपल्या आजोबांचे व वडिलांचे समाजकार्य युवा नेते आशुतोष काळे यशस्वीपणे पुढे चालवीत असून त्यामुळे या परिसराचा विकास कोणीच रोखू शकणार नाही.असा विश्‍वास त्यांनी उद्योग समुहाचे वैभव पाहून व्यक्त केला. 

याप्रसंगी माजी आ. अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या पुष्पाताई काळे, साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या चैताली काळे, कारखान्याचे सुनील शिंदे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सामाजिक कार्यकर्ते विजयराव बनकर, राजेंद्र जाधव, कारभारी जाधव, छबुराव आव्हाड, संभाजीराव काळे, कारभारी आगवन, नारायण मांजरे, प्रमोद जगताप, संलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, सेक्रेटरी एस.एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ , पंचायत समितीच्या सभापती, उपसभापति, सर्व सदस्य, जिल्हा परिषद सर्व सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व रयत संकुलाचे प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी साई सुवर्ण प्रतिष्ठान गौतमनगर व संजीवनी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले.