कराड दक्षिणमधील चार नळपाणी योजनांना माझ्या सहीने मंजुरी : आ. चव्हाण


कराड ( प्रतिनिधी) : मी मुख्यमंत्री असताना जलस्वराज्य टप्पा क्रमांक-1 ही योजना राबवली. वाडपी हा नेहमी झुकते माप आपल्याकडे टाकतो. त्याप्रमाणे या टप्प्यात कराड तालुक्यातील अकरा गावे निवडली. त्यामध्ये कापील, सैदापूर, कार्वे यासह गावांचा समावेश होता. चांगले नेतृत्व असणार्‍या गावांच्या योजना पूर्ण झाल्या. परंतु शेजारील कार्वे गावात अद्याप पाणी मिळालेले नाही. अकरा गावांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जलस्वराज्य टप्पा क्रमांक-2 आखला. जागतिक बँकेच्या सहकार्याने हा टप्पा राबवत असताना राज्यातील सातारा व पुणे हे दोन जिल्हे पथदर्शक म्हणून निवडले. यामधून जिल्ह्यातील सहा गावे घेतली. त्यामध्ये कराड दक्षिणमधील चार व कराड उत्तरमधील दोन गावे होती. कराड दक्षिणमध्ये गोळेश्वर, मुंढे, खोडशी, रेठरे बुद्रुक व उत्तरमधील पार्ले आणि विरवडे या गावच्या योजनांचा 2014 मध्ये माझ्या सहीने आदेश निघालेला आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

रेठरे बुद्रुकची पाणीयोजना श्रेयवादामुळे रेंगाळली होती असे स्पष्ट करुन ज्या मंत्र्यांच्या मागे तुम्ही फिरता, त्यांना विकासाची दृष्टी नाही. असेही त्यांनी यावेळी कुणाचे नाव न घेता सांगितले. कापील (ता. कराड) येथे 24 बाय 7 पाणी योजनेचे लोकार्पण, विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन तसेच कराड दक्षिण राष्टीय कॉंग्रेसचे नूतन अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, एमजीपीचे माजी संचालक राजेंद्र होलाणी, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, माजी सदस्या विद्याताई थोरवडे, पैलवान नानासाहेब पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, शंकरराव चांदे, सरपंच अलका जाधव, रेखाताई जाधव, नितीन थोरात, कराड दक्षिण युवकचे अध्यक्ष वैभव थोरात यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
आ. चव्हाण म्हणाले, जेथे चांगले नेतृत्व आहे, तेथे पाणीयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. विकासाची दृष्टी नसलेल्या ठिकाणी कुणीतरी न मागता काम दिल्यामुळे महत्व वाटत नाही. त्यामुळे कापीलपेक्षा कितीतरी पटीने मोठे असणार्‍या रेठरे बुद्रुकसारख्या गावातील योजना श्रेयवादामुळे मुद्दाम रेंगाळली. तुम्ही कामांची यादी करा. नवीन सरकारकडे जलस्वराज्य टप्पा क्रमांक तीनमधून मतदारसंघातील दहा गावे घेतली असती, तर मला फार आनंद झाला असता असेही त्यांनी नाव न घेता स्पष्ट केले. कापीलच्या योजनेचे मला खूप समाधान वाटते. स्वर्गीय भास्करराव शिंदेंची योजनेमागे प्रेरणा होती. कापीलमधील महिलांच्या डोक्यावरील घागर उतरल्याचे मला समाधान आहे. ते म्हणाले, आंध्रप्रदेश व कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला, तरीही महाराष्ट्रातील सरकार दुष्काळ जाहीर करण्यामध्ये कंजुषी का करत आहे. त्यांनी दुष्काळाचे निवडलेले निकष शेतक़र्‍यांच्या विरोधात आहेत. 31 ऑक्टोंबरच्या यादीमधून यापूर्वी समाविष्ठ असलेल्या 151 तालुक्यांच्या यादीतील कराड तालुका वगळला आहे, याचे खूप दुःख वाटत आहे. याकामी महसूलमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे होते. परंतु दुस़र्‍याचे काम मी केले म्हणून ते उद्‌घाटने करण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 
आ. आनंदराव पाटील म्हणाले, पृथ्वीराजबाबांच्या कामाची तुलना कुणीच करु शकत नाही. भाजप सरकार कर्जमाफी करण्यामध्ये दिरंगाई करत आहे. याचा अर्थ सरकारला शेतक़र्‍यांविषयी राग आहे. 
पांडुरंग देशमुख, मोहनराव जाधव, भरत पाटील, वसंतराव जाधव, अलका जाधव, रेखाताई जाधव, पोपटराव जाधव, सुरेश जाधव, प्रल्हाद देशमुख, भाऊसाहेब ढेबे, ज्ञानदेव मोरे, किसनराव जाधव, आत्माराम जाधव, शिवाजीराव जाधव, तानाजी गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. व रविंद्र सावंत यांनी आभार मानले.

बंडानाना व अजितअप्पांची जोरदार टोलेबाजी....


बंडानाना जगताप म्हणाले, तालुक्यातील काही मंडळींनी इकडचा बोर्ड तिकडे नेवून उद्‌घाटने करण्याचा उद्योग चालवला आहे. राज्यमंत्र्याचा दर्जा असणा़र्‍या व्यक्तीकडे पृथ्वीराजबाबा मुख्यमंत्री असताना साधे लेटरपॅड नव्हते. तर अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, राज्यमंत्र्याचा एवढा शुभपायगुण आहे की, अध्यक्ष झाल्याबरोबर विठ्ठलाने मुख्यमंत्र्यांचे दरवाजे बंद केले. त्यामुळे तुम्ही कितीही धडपड करा, तुमची गट्टी कधीच गदीमध्ये जावू देणार नाही. पृथ्वीराजबाबांना निवडून येण्याचा नाद आहे. आणि राज्यमंत्र्यांचा दर्जा असणार्‍यांना पडायचा नाद आहे. ते एकदा उत्तरेत पडले त्यानंतर दक्षिणेत पडले आहेत. भोवतीच्या चार कम्पाऊंडरांच्या सल्ल्यावर ते कायम भावी आमदार राहणार असल्याचा टोलाही त्यांनी नाव न घेता अतुल भोसलेंना लगावला. पृथ्वीराजबाबा नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी लढतात. पण ही मंडळी चंद्रकांतदादांच्या दारात जावून रडतात, असे शेवटी अजितआप्पांनी म्हणताच एकच हशा पिकला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget