‘हिरवाईत’ साजरी झाली अनोखी दिवाळी कातकरी समाजातील बालचमूला फराळ व कपडेवाटप


सातारा : (प्रतिनिधी) : काही वर्षांपूर्वी सदरबझार परिसरातील कचरा डेपो असलेल्या या परिसराला प्रा. संध्या चौगुले यांच्या अथक प्रयत्नातून आता वेगळे रुप आले आहे. हिरवाई या नावाने आकाराला आलेले हे छोटेसे वन नेहमीच निरनिराळ्या उपक्रमामुळे चर्चेत असते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे हिरवाईत यंदा कातकरी समाजाच्या बालगोपाळांनी दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. 

प्रा. संध्या चौगुले यांनी 2000 सालापासून केलेल्या अथक प्रयत्नाने आजची हिरवाई नटली आहे. केवळ फोटोसेशनपुरती झाडे न लावता ती वाढवून व त्यांचे संगोपन करुन ती मोठी कशी करावेत याचा नवा वस्तुपाठच या निमित्ताने प्रा. चौगुले यांनी पर्यावरणप्रेमींसमोर ठेवला आहे. आतापर्यंत केलेल्या वृक्षलागवडीपैकी तब्बल 60 हजार वृक्ष जगवून ते मोठे करण्याची कामगिरीही त्यांनी केली आहे. दरम्यान, हे करत असतानाच त्यांनी कातकरी समाजासाठी केलेले कामही दखलपात्र ठरले आहे. 

याच कातकरी समाजातील बाळगोपाळांसाठी त्यांनी हिरवाईत सुरु केलेल्या हिरवाई कातकरी-आदिवासी दिवाळी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. सुमारे पावणेतीन एकर क्षेत्रात असलेल्या या परिसराला आकाशकंदील, पर्यावरणाचे संदेश फलक, विविध पक्षी, फुले यांच्या प्रतिकृती यांनी सजवले होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, 2006 साली प्रा. चौगुले यांच्या हिरवाईला मूर्त स्वरुप आले आहे. कचरा डेपोला हिरवाईत रुपांतरीत करणार्‍या त्यांच्या या उपक्रमाची खरे तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. आदिवासी समाजासाठी काम करणार्‍या प्रा. संध्या चौगुले यांचे पर्यावरणविषयीचे कार्य हे इतरांसाठी दीपस्तंभासारखे आहे असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. यावेळी अभिनेते किरण माने व ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले, ऍड. वर्षा देशपांडे यांनीही आपले पर्यावरणविषयी मत व्यक्त केले. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या आस्थाचे विजय निंबाळकर, तानाजी मस्के यांना विशेष पुरस्कार देवून गौरवले. शहिद जवानांच्या पत्नींसाठी काम करणार्‍या जयहिंद फौंडेशनचे अतुल गायकवाड यांचाही गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमास दादासाहेब यादव, डॉ. सोमनाथ साबळे, जगदीश जिरमल, ऍड. शैला जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget