वंचितांच्या भेटीला होशिंग विद्यालयाचे शिक्षक ! प्रयोगवनच्या ’संडे स्कुल’ला दिली स्नेहभेट


जामखेड ता./प्रतिनिधी 
जन्मता:च कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का असलेल्या भटक्या समुहातील अनेक जमाती आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. या वंचित उपेक्षित घटकांचे कल्याण व्हावे व हे समाज घटक मुख्य प्रवाहात यावेत यासाठी शिक्षण हाच एकमेव समृद्धीचा मार्ग आहे. हेच हेरून प्रयोगवन परिवार संडे स्कुलच्या माध्यमांतून पारधीवस्तीवर करत असलेलं कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्रा.अनंता खेत्रे सर यांनी केले. जामखेड तालुक्यातील हळगांव येथील प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने कुसडगांव जवळील काझेवाडी तलाव परिसरातील पारधी वस्तीवरील मुलांसाठी संडे स्कुल हा अनौपचारिक शाळेचा सामाजिक उपक्रम चालवला जातो. या उपक्रमास ल.ना. होशिंग विद्यालयातील सर्व शिक्षक व तालुक्यातील विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक यांच्या टीमने रविवार दि. 4 रोजी भेट देत बालकांशी संवाद साधला. ही स्नेहभेट मुकुंद राऊत सर व स्नेहालयचे योगेश अब्दुले यांनी घडवून आणली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रा.अनंता खेत्रे बोलत होते. यावेळी शिवानंद हलकुडे, एस.एन.पारखे, मुख्याध्यापक कोपनर , बी.ए.पारखे , अडसूळ वायकर , मुकुंद राऊत , कदम , देडे, पोले, होशिंग भाऊसाहेब, पी.टी.गायकवाड , क्षीरसागर, सुपेकर , कलकर्णी , संतोष देशमुख, कोळी भाऊसाहेब, अविनाश नवगिरे, गांधी , सांगळे निलेश शिंदे, सागर पवार, सत्तार शेख सह आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे तसेच संडे स्कुल या उपक्रमाची गरज विशद करत समाजातील वंचित, उपेक्षित घटकातील बालकांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी प्रयोगवन संस्था संडे स्कुलच्या माध्यमांतून करत असलेल्या कार्यास समाजातील संवेदनशील व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मायेचा आधार द्यावा असे अवाहन केले.या आवाहनास प्रतिसाद देत प्रा.कोपनर सर, प्राचार्य अनंता खेत्रे, प्रा. हलकुडे सर यांनी संडे स्कुलच्या नव्या टिन शेड उभारणीसाठी पाच हजार पाचशे रूपयांची आर्थिक मदत दिली. तसेच पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने संडे स्कुलच्या 20 मुलांना नव्या उबदार शालींचे तसेच प्रा.मुकुंद राऊत व ल.ना. होशिंग विद्यालयाच्या प्राध्यापकांकडून दिवाळी फराळ व चित्रकलेच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी पुढे बोलताना प्रा.अनंता खेत्रे म्हणाले की भटक्या समुहातील मुलांकडे समाजाने दुर्लक्ष करू नये. समाजातील प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे याकरिता सामुहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रयोगवन परिवार ही सामाजिक संस्था पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी जे कार्य करत ते कौतुकास्पद अन प्रेरणादायी आहे. सत्तार शेख व स्नेहालयचे योगेश अब्दुले हे दोघे सेवाव्रती दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी वंचित उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वातून सुरू केलेल्या सेवाकार्याला बळ व पाठीवर कौतुकाची थाप देताना ऊर अभिमानाने भरून आला आहे. असे प्रा.अनंता खेत्रे म्हणाले. यावेळी प्रा.कोपनर सर, स्नेहालयचे योगेश अब्दुले सह आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. संडे स्कुल प्रकल्पातील बालकांनी सर्व पाहुण्यांचे रानफुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रकल्पातील निरागस बालकांशी सर्व प्राध्यापकांनी संवाद साधत भारावलेपणाची भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा.देडे यांनी केले तर आभार प्रा.कदम यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget