Breaking News

तुकाराम साहित्य पुरस्कार मला सर्वश्रेष्ठ आहे : इंगोले


जामखेड/प्रतिनिधी 
कथा, कविता, कादंबरी, समीक्षा व बाल साहित्य असे नव्वदहुन अधिक पुस्तके माझी प्रसिद्ध झालेली आहेत. माझ्या ग्रंथांना आजवर शंभर पुरस्कार मिळाले आहेत. परंतु जामखेडचा मराठी साहित्य प्रतिष्ठानचा संत तुकाराम साहित्य पुरस्कार 121 वा असल्याने हा पुरस्कार मला सर्वश्रेष्ठ आहे. असे भावोदगार सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री डॉ.प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा बांधुन संस्थेच्या वतीने अध्यक्ष पवार, मधुकर राळेभात, विद्या काशिद, विठ्ठल राऊत, भानुदास बोराटे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी इंगोले बोलत होत्या.

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन चांदणझुला व संत तुकाराम साहित्य पुरस्काराचे वितरण बी.एड्.कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले. यावर्षी जिव्हाळा फाऊंडेशनने मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यात सहभाग घेतला. यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, गझलकार प्रा.तुकाराम पाटिल पुणे, कवी संजय बोरुडे संगमनेर, शंकर वाडेवाले नांदेड, इ.8 वीच्या पाठ्यक्रमाचे कवी हनुमंत चांदगुडे जेजुरी, शेतकरी कवी हरिश्‍चंद्र पाटिल सोलापुर, संगिता झांझुर्णे पुणे, कवी निलेश व प्रदिप गांधलीकर पुणे, इंद्रकुमार झांजे, संगीता होळकर, नागेश शेलार बीड, आदि कवी उपस्थित होते. पुरस्कार वितरण संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले, तर कविसंमेलन प्रसिद्ध लेखक व गझलकार प्रा.तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार झाले. बाबासाहेब सौदागर, तुकाराम पाटील, संजय बोर्डे, प्रतिमा इंगोले, हनुमंत चांदगुडे, शंकर वाडेवाले, हरिश्‍चंद्र पाटील यांच्या निसर्ग शेतकरी जीवन, प्रेम व सामाजिक विषयांवरील कवितांना श्रोत्यांनी विशेष दाद दिली. संगिता झांझुर्णे, होळकर, प्रदिप गांधलीकर, इंद्रकुमार झांजे, कवी निलेश यांच्या कवितेत श्रोते समरस झाले. नागेश शेलार यांनी सूत्रसंचालन केले. मोहन डूचे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, शत्रुघ्न कदम, जतीन काजळे, राजाराम सोनटक्के, अनिल अडसूळ, सिध्दार्थ घायतडक, खलील मौलाना, हाजी जावेद सय्यद, कुंडल राळेभात, नामदेव राळेभात, कल्याण काशिद, अवधुत पवार, राम निकम, रंगनाथ राळेभात, सुरेश कुलथे आदि मान्यवरांसह पत्रकार व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.