Breaking News

सातारा बसस्थानकात चालक-वाहकांना अभ्यंगस्नान


सातारा (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणासाठी चाकरमान्यांना वेळेत घरी सोडणार्‍या एसटी चालक-वाहकांना मात्र, दिवाळीची पहाट बसस्थानकातच काढावी लागते. तथापि, घरापासून दूर असलेल्या या कर्मचार्‍यांना दिवाळीची पहिली अंघोळ अभ्यंगस्नान घालून करण्याचा पायंडा सातारकरांनी पाडला आहे. मंगळवारी पहाटे नरक चतुदर्शीला सातारा एसटी आगार व्यवस्थापन तसेच काही सेवाभावी संघटनांच्या वतीने मुक्कामी असलेल्या एसटी वाहक आणि चालकांना उटणे लावून अंघोळ घातली. याप्रसंगी सातारा आगार प्रमुख पळसुले व अधिकार्‍यांनी एसटी कर्मचार्‍यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

एसटीचा कर्मचारी घरापासून दूर राहून प्रवाशांना सेवा देतो. कामानिमित्त घरापासून दूर असल्याने बहुतेक सणाला कुटुंबियांपासून दूर राहत असल्याची हुरहूर असते. दिवाळीला सणासाठी चाकरमानी गावी परतत असतात. मोठ्या संख्येने प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने एसटी कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येतो. अशावेळी ऐन दिवाळीत सुट्टी मिळणे अवघड असते. त्यामुळे घरापासून दूर राहून सेवा बजावताना त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद घेता यावा. या दृष्टीने सातारा येथील सेवाभावी संघटनांनी चालक-वाहकांना अभ्यंगस्नान घालण्याचा अभिनव उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. दि. 6 रोजी नरक चतुदर्शीला पहाटे चालक-वाहकांना अभ्यंग स्नान घालून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. या उपक्रमाबद्दल एसटी कर्मचार्‍यांमधून समाधान होत आहे. वाहतूक नियंत्रक सुरेश पाठक, दत्तात्रय साळुंखे यांच्यासह कर्मचार्‍यांनी याचे नियोजन केले.
दरम्यान, फलटण आगारात प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, वाहतुक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, वाहतुक नियंत्रक अमोल वडगावे, चालक डांगे यांनी कर्मचार्‍यांना उटणे लावून आंघोळ घातली. आगार व्यवस्थापक कुंभार, स्थानक प्रमुख हनुमंत फडतरे, वाहतुक निरीक्षक दत्तात्रय महानवर, वाहतुक निरिक्षक धीरज अहिवळे यांनी सर्व कर्मचार्‍यांना दिपावली निमित्त शुभेच्छा दिल्या. आगारात गरम पाण्याची सोय करण्यासाठी दिपक शिंदे, वाहक श्रीपाल जैन, वाहक सुधीर कराड, सुरक्षा रक्षकांनी परीश्रम घेतले.