Breaking News

अवनी वाघिणीच्या शिकारीची सुपारी देणारेच चौकशी समितीवरः ठाकरे


मुंबई (प्रतिनिधी)ः सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली. मग, सर्जिकल स्ट्राईक काय पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता? मग, त्याचं श्रेय कसे घेतले? मग, या पापाचे धनी तुम्ही होणार का? असे सवाल करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. 

अवनी वाघिणीला ठार केलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांच्या नियुक्तीवर ठाकरे यांनी आक्षेप घेतला असून अवनीची सुपारी देणारेच या समितीवर घेण्यात आले आहेत, असे निदर्शनास आणून ही चौकशी समिती म्हणजे एक फार्स असल्याची टीका त्यांनी केली. अवनीला ठार मारणारेच समितीवर असतील, तर तिच्याकडून निष्पक्षपाी चौकशीची अपेक्षा ठेवता येणार नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मुनगंटीवार यांना लक्ष्य केले असतानाच आता मुनगंटीवार यांनीही निरुपम यांना प्रत्युत्तर दिले आहे. निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. निरुपम यांनी सत्याचा निर्घृण खून केला असून त्यांच्याविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असल्याचा इशारा मुनगंटीवार यांनी दिला आहे. 

अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन काँग्रेसने शनिवारी मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. मुनगंटीवार हे प्राण्यांच्या हत्येसाठी ओळखले जातात. ते शिकार करणार्‍या माफियांच्या टोळीत सामील असावेत, असा गंभीर आरोप निरुपम यांनी केला होता. मुनगंटीवार यांची वनमंत्रिपदावरुन हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही निरुपम यांनी केली होती.
निरुपम यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाहीत, असे ते म्हणाले. अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी केलेले सर्व आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले आहेत.