तूर व हरभर्‍याचे पैसे न मिळाल्याने विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशन कार्यालयाची तोडफोड


मलकापूर : नाफेडला विकलेल्या तूर व हरभराचे पैसे आठ महिन्यांनंतरही न मिळाल्याने नांदुरा तालुक्यातील शेतक-यांचा राग अनावर झाला. शेतकर्‍यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मलकापूर येथील विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड करीत कुलूप ठोकल्याची घटना घडली. नांदुरा तालुक्यातील 482 शेतकर्‍यांनी त्यांचा 6824 क्विंटल हरभरा तीन कोटी रुपयांचा व 35 शेतकर्‍यांनी त्यांची 25 लाख रुपयांची तूर मार्च 2018 मध्ये नाफेडला विकली आहे. सदरहू पैसे पेरणीचे आधी मिळावे म्हणून असंख्य निवेदने, विनंती अर्ज फाटे केले. परंतु राज्य शासनाने पैसे दिले नाही. शेवटी कर्ज काढून शेतकर्‍यांनी पेरणी केली. तीन तीन वेळा पेरणी करूनही दुष्काळामुळे पीक आले नाही. दिवाळीत तरी राहिलेले पैसे मिळतील म्हणून या शेतकर्‍यांनी मलकापूर येथील दि विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मध्ये असंख्य चकरा मारल्या. दिवाळीसुद्धा कोरडी जाईल म्हणून हे शेतकरी अ‍ॅड. हरीश रावळ नगराध्यक्ष, बंटी पाटील, पुरुषोत्तम झालटे, शुभम ढवळे, अनिल गांधी यांचेसह कार्यालयात पोहचले असता, आजही पैसे मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आता दिवाळी काळी जाईल म्हणून सर्व शेतकरी संतप्त झाले व त्यांनी या कार्यालयाची प्रचंड तोडफोड करीत कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी भाजप सरकार हाय हाय, शेतकर्‍यांना उपाशी मारणार्‍या सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी केली. अचानक तोडफोड व घोषणाबाजीमुळे या भागात असंख्य नागरिक जमा झाले होते. या आंदोलनात मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, पुरुषोत्तम झाल्टे (सरपंच पातोंडा), विधानसभा युवक अध्यक्ष बंटी पाटील, जिल्हा एनएसयूआय सरचिटणीस शुभम ढवळे, नगरसेवक अनिल गांधी, सुनील बगाडे तसेच विश्‍वजित पाटील, अविनाश वेरूळकर यांचेसह असंख्य शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. जर दोन दिवसांत शेतकर्‍यांचे हक्काचे कष्टाने पिकवलेल्या धान्याचे पैसे शासनाने दिले नाही तर यानंतर आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. याची राज्य सरकार व केंद्र सरकारने नोंद घ्यावी. असा इशारा अ‍ॅड.हरीश रावळ यांनी दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget