Breaking News

बोंडअळीचे पैसे द्या अन्यथा आंदोलन, माजी आ. सानंदा यांचा इशारा


खामगांव,(प्रतिनिधी): बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसानीची शासनाने अद्याप भरपाई दिली नसल्याने शेकडो शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी अंधारात जात आहे. वारंवार मागणी करूनही सरकार केवळ आश्‍वासनाची खैरात वाटत असून दोन दिवसात बोंडअळीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा न केल्यास माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसने दिला. 

काँगे्रसच्या अल्पसंख्यांक मंडळाच्या शिष्टमंडळाने तहसिलदार डॉ.शीतल रसाळ यांना 5 नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले. यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.वसीमोदद्ीन, शहर अध्यक्ष बबलु पठान, शेख हाजी जमदार, जुनेद मुल्लाजी,माजी सरपंच अब्दुल गफुर मोमीन, मो.रफीक, पं.स.चे माजी उपसभापती गोपाल सातव,सचिन वानखडे, रमेश वानखडे, अनंता सातव,बंडुभाउ सातव यांच्यासह पिंपळगाव राजा येथील शेतकरी,काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागील वर्षी सन 2017-18 या खरीप हंगामाच्या कापुस पिकावर बोंडअळीने हल्ला केल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने नुकसानीची मदत जाहिर केली. जिल्हयातील अनेक तालुक्यामध्ये अनुदानाचे वाटप शासनातर्फे झाले आहे. परंतू खामगांव तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकर्‍यांना अनुदान वाटप झालेले नाही. पिंपळगाव राजा येथे सुध्दा अनेक शेतकर्‍यांचे बोंडअळीमुळे नुकसान झालेले असुन वारंवार निवेदने देउन देखील पिंपळगाव राजा येथील शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत शासनाच्या मदतीचे पैसे मिळालेले नाही. शासनाने तातडीने शेतकर्‍यांना मदत द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार यांच्याशी चर्चा करतांना माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, दिवाळी सारखा महत्वाचा सण सुरु असतांना देखील अद्याप पर्यंत शेतकर्‍यांना बोंडअळीच्या नुकसान भरपाईची मदत मिळालेली नाही. ही दुर्देवाची बाब आहे. शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पैसे मिळावे अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी यावेळी दिला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नावाची यादी नुकतीच शासनाकडुन प्राप्त झाली असुन त्या यादीचे अवलोकन करुन यादी बँकेकडे पाठवुन शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत मिळवुन देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही तहसीलदार शीतल रसाळ यांनी यावेळी शेतकर्‍यांना दिली.