Breaking News

महात्मा फुलेंच्या नावामुळेच विद्यापीठाचा सन्मान - सबनीस

राहुरी/प्रतिनिधी 
महात्मा फुलेंचे माती आणि माणसांशी दृढ अस नात होत. मातीशी संबंध असणार्‍या शेतकर्‍यांसाठी आणि जातीजातीत विभागलेल्या समाजासाठी त्यांनी डोंगराएवढे काम केले. आज शेतकर्‍यांसाठी अवस्था दुष्काळामुळे फार वाईट झालेली आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याची दररोज निघणारी तिरडी परिस्थीतीचे गांभिर्य दर्शविते. या पार्श्‍वभुमीवर शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल तर आज महात्मा फुलेंचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. महात्म्यांची जयंती, पुण्यतिथी केवळ फोटोला हार घालुन साजरी करु नका तर त्यांचे विचार आचरणात आणा. शेतकर्‍यांकरीता उत्कृष्ठपणे काम करणार्‍या विद्यापीठाला महात्मा फुलेंचे नांव दिल्यामुळे विद्यापीठालाच सन्मान प्राप्त झाला आहे असे प्रतिपादन डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले. 

महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा फुलेंंच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ लेखक, अभ्यासक, समिक्षक व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेले डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथ होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता कृषि डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबतमठ, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंह चौहान, क्रिडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड व सबनीस उपस्थित होते. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, उद्याच्या महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी महात्मा फुलेंच्या विचाराची गरज आहे. महात्मा फुले कुठल्याही जातीविरोधी नाही तर जातीयवादाच्या विरोधी होते. संविधान आणि महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा एकच आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. के.पी. विश्‍वनाथा म्हणाले, हा दिवस पुजनीय महात्म्यांचे पुजन करण्याबरोबरच त्यांचे विचार आचरणात आणण्याचा आहे. महात्मा फुलेंनी शेतकर्‍यांसाठी फार मोठे काम केले. शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. शेतीमधील सध्याच्या आव्हाणांना सामोरे जाण्यासाठी महात्मा फुलेंचे विचार अजुन मार्गदर्शक आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. दिलीप पवार यांनी केले. याप्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती बोरसे यांनी केले. तर महाविरसिंह चौहान यांनी आभार मानले.