आधुनिक तंत्राच्या सहाय्याने युवकाने केली शेतीत प्रगती


नाशिक - शेतीत फारसे उत्पन्न नाही, त्यापेक्षा एखादी नोकरी केलेली बरी असा सर्वसाधारण विचार समाजात रुजत असताना निफाड तालुक्यात डोंगरगावच्या बजरंग पातळे या तरुण शेतकऱ्याने शासनाच्या योजनेला प्रयत्नांची जोड देत फायद्याची शेती करून दाखविली आहे.

बजरंग यांनी कला शाखेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. मात्र शेतीची आवड असल्याने वडिलोपार्जित जमिनीवर त्यांनी शेती करण्यास सुरूवात केली. कांदे, सोयाबीन अशी पारंपरिक पिके ते घेतात. वाढलेले मजूरीचे दर आणि मजूरांची उपलब्धता कमी असल्याने शेती करताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागे.

त्यांनी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत ट्रॅक्टर खरेदी केली आहे. कृषी सहाय्यक प्रणव होळकर यांनी त्यांना चांगले मार्गदर्शन केले. त्यांना एक लाखाचे अनुदान मंजूर झाले. त्यांनी स्टेट बँकेकडून कर्ज काढत 4 लाख 24 हजाराचे 25 एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर घेतले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते त्यांना ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले.

ट्रॅक्टर आल्याने शेतीच्या कामांची गती वाढली आहे. पूर्वी मजूरीवर एका हंगामात 20 हजार याप्रमाणे तीन हंगामासाठी 60 हजार खर्च होत असे. शिवाय मजूर खोल मशागत करीत नसल्याने प्रत्येक बाबींवर लक्ष द्यावे लागे. ट्रॅक्टरमुळे ती अडचण दूर होऊन खर्चदेखील वाचला आहे. जमीनीची चांगली मशागत होत असल्याने उत्पादनात फरक दिसून आला आहे.
बजरंग इतरांना देखील भाड्याने ट्रॅक्टर देतात. डिझेलचा खर्च निघून त्यातून अधिकचे उत्पन्नही मिळते. ट्रॅक्टरमुळे शेतीकामाची गती वाढली आहे. शेतमालाला भाव असताना बाजारात तातडीने माल पोहोचविणे शक्य होत आहे. इतरांवर अवलंबून रहाणे कमी झाल्याने शेतीचे नियोजनही सोपे झाले आहे.
बजरंग पातळे- नोकरीपेक्षा शेतीत उत्पन्न जास्त आहे. गरज असते ती प्रयत्नांची. मी माझ्या मनाने चांगल्या कल्पना राबवू शकतो. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चे विश्व निर्माण केलेले केव्हाही चांगले. तसे करण्याची संधी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानामुळे मिळाली आहे. आज ट्रॅक्टरमुळे कमी खर्चात चांगली शेती करता येते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget