दुष्काळप्रश्नी पुसेसावळीत रास्ता रोको


पुसेसावळी,  (प्रतिनिधी) : संपूर्ण खटाव तालुका तात्काळ दुष्काळी तालुका म्हणून घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी पुसेसावळी येथील दत्त चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी चटणी व खरडा भाकरी खावून काळी दिवाळी साजरी केली.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पुसेसावळी जिल्हा परिषदेच्या गटातील नागरिकांनी पुसेसावळी येथील दत्त चौकात रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. सुमारे एक तास आंदोलन करण्यात आले. दरम्यान, काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. या आंदोलनात पुसेसावळीसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश व्हावा या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांना देण्यात आले. प्रशासनाच्या चुकीच्या माहितीमुळे तालुक्यात दुष्काळाचे अस्मानी व सुल्तानी संकट उभे राहिले आहे. तातडीने खटाव तालुका दुष्काळी घोषित करुन तालुकावासियांना न्याय द्यावा. पारगाव व येळीव तलाव टंचाईमधून उरमोडीच्या आवर्तनाने भरुन द्यावा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी आपली मते व्यक्त केली. त्यामध्ये मंत्र्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण करावे. लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी वेळ द्यावा. ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी अन्याय सहन न करता रस्त्यावर उतरावे. रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील पण खटाव तालुका दुष्काळी जाहीर झाल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रशासनाने शेतकर्‍यांची थट्टा थांबवावी व दुष्काळ घोषित करावा अन्यथा शनिवारी तालुकाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget