Breaking News

डॉ.आंबेडकरांचे तैलचित्र लावायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का?


बीड : मंत्रालय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे प्रास्ताविक लावण्यासंदर्भात वर्षभरापुर्वी प्रशासन स्तरावरील कार्यवाही पुर्ण करण्यात आली असून देखील राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे मागील वर्षभरापासुन हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. मुख्यमंत्र्यांकडे यासाठी वेळ नाही का ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आज संविधान दिनानिमित्त विधान परिषदेत सभापती यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलतांना धनंजय मुंडे यांनी हा महत्वाचा विषय उपस्थित केला. ज्या इमारतीतून राज्याचा कारभार पाहिला जातो त्या शासकीय इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व संविधानाचे तैलचित्र लावल्यास त्यांचा उचित सन्मान होणार आहे. परंतू यासाठी मुख्यमंत्री वेळ देवू शकत नाही का ? असा सवाल उपस्थित केला . संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ.बाबासाहेबांचे व संविधानाच्या प्रास्ताविकाचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावर महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेऊन कारवाई करतो असे सांगीतले.