उमेदवारीवरून काँग्रेसच्या नेत्यांत वाद; राहुल गांधी यांच्यासमोर शिंदे-दिग्विजयसिंह भिडले


नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. विधानसभेत काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील मतभेद काही संपायला तयार नाहीत. काँग्रेसमधील नेत्यांच्या अंतर्गत वादाचा फटका तेथील विधानसभेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह व प्रचार प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातल वाद उफाळून आला आहे. 

काँग्रेसमधील अंतर्गत वाद काही नवा नाही. सध्या मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. याच दरम्यान बुधवारी पक्षाच्या प्रदेश समितीच्या बैठकीत गांधी यांच्या समोरच काँग्रेसचे शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यामध्ये वाद झाला. मध्य प्रदेशमध्ये सर्वांना एकत्र घेवून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या राहुल गांधींसमोर या भांडणमुळे नवाच पेच निर्माण झाला आहे. याच संधीचा फायदा घेत भाजपने काँग्रेसवर टीका करत राहुल गांधीच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

मध्य प्रदेशमधील निवडणुकीच्या प्रचाराची धुरा गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि शिंदे यांच्यावर सोपवली आहे. प्रचारामध्ये दिग्विजय सिंह यांना कोणतीच जबाबदारीही देण्यात आली नाही. यामुळे दिग्विजय सिंह नाराज आहेत. त्यामुळे तर मध्यंतरी त्यांनी मला प्रचाराला बोलविले, तर काँग्रेसला मते मिळणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. बुधवारी संध्याकाळी काँग्रेस प्रदेश समितीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत तिकीट वाटपाच्या चर्चा सुरु असताना शिंदे आणि दिग्विजय या दोघांनीही त्यांच्या समर्थकांची नावे पुढे केली. दोघांमध्ये तिकीट कोणाला द्यायचे या मुद्द्यावरून वादावादी झाली. विशेष म्हणजे त्याठिकाणी उपस्थित असलेले गांधी शांतपणे हा गोंधळ पाहत होते. विरोधकाला तिकीट मिळाले, तरी त्याचे काम करा,असा सल्ला गेल्या आठवड्यात देणारे दिग्विजय सिंह या वेळी मात्र समर्थकांच्या तिकिटासाठी आडून बसले. 
चौकट

सुंदोपसुंदी काँग्रेसला भोवणार


मध्य प्रदेशमध्ये विधानसभेसाठी 28 नोव्हंबर रोजी मतदान होणार आहे आणि 11 डिसेंबरला निकाल लागणार आहेत. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभूत करून काँग्रेस आपली सत्ता स्थापन करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. अशा पार्श्‍वभूमीवर जनतेच्या मनात सत्तापालट करण्याचे आहे. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणातही हा मुद्दा पुढे आला आहे. चांगली संधी असताना सुंदोपसुंदीमुळे ही संधी काँग्रेस घालवणार का, हाच आता प्रश्‍न आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget