Breaking News

सातार्‍यात लाडू-चिवडा महोत्सवास प्रारंभ


सातारा (प्रतिनिधी) कडाडलेल्या महागाईत नागरिकांना माफक दरात दिवाळी फराळातील लाडू-चिवडा मिळावा यासाठी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने गत 13 वर्षापासून सुरु असलेल्या लाडू-चिवडा महोत्सवाला शनिवारी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा यांच्या उपस्थितीत चेअरमन दिलीप पिलके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा म्हणाले, पतसंस्थेच्यावतीने गेली 13 वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसादही मिळतो. लाडू, चिवडा तयार करण्यासाठी बेसन, साखर, शेंगतेल, पोहा, कुरमुरे, दर्जेदार वापरले जातात याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. हा लाडू-चिवडा ना नफा ना तोटा या तत्वावर विकला जातो असेही सारडा यांनी यावेळी सांगितले. यावर्षी मजुरी, इंधन, कच्चा मालाच्या दरात वाढ झाली असतानाही संस्थेने चिवडा केवळ 110 रुपये किलो व लाडू केवळ 105 रुपये किलो दराने विक्री करण्यात येणार आहे.मल्हार पेठेतील प्रभाकर राऊत मिठाईवाले यांच्या दुकानात दि. 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये या उपक्रम होत आहे. 

कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन शिवप्रसाद मिणीयार तसेच सर्व संचालक व सेवक वर्ग उपस्थित होता. या उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा यांच्यासह संचालक मंडळाने यांनी केले आहे.