दिवाळी हंगामानिमित्त आजपासून एसटीची दरवाढ


सातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यावर्षीही दि. 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीसाठी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात एसटीचा प्रवास महागला आहे. एसटीच्या हंगामी भाडेवाढीने प्रवाशांचं दिवाळं निघालं आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जावू लागली आहे. गरीबाचा रथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एसटी सर्वसामान्य प्रवाशांसाठी आधार ठरू लागली आहे. मात्र ऐन दिवाळीच्या सणात दरवर्षीप्रमाणे हंगामी भाडेवाढ केल्यामुळे यावर्षीही एसटी प्रवाशाचं दिवाळंच काढणार आहे
दिवाळी सणाची सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने दिवाळी काळात जादा एसटी बसेस सोडण्याची घोषणा केली आहे. महामंडळाने हंगामी भाडेवाढ केली आहे. दि. 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत एसटीचा भाडेवाढ रहाणार आहे. खासगी बस सेवा पुरविणारे दिवाळीच्या काळात अव्वाच्या सव्वा दर आकारत असतात. म्हणून एसटी महामंडळाने अधिकच्या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

साध्या गाडीसाठी सातारा-स्वारगेट 145 रुपये, सातारा-कोल्हापूर साधी गाडी 175 रुपये,सातारा-सांगली 175 रुपये, सातारा-मुंबई 370 रुपये, सातारा-बोरिवली 370 रुपये, सातारा-मिरज 190 रुपये, शिवशाही बस सातारा-स्वारगेट 220 रुपये, सातारा-मुंबई 560 रुपये, सातारा-बोरिवली 595 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. ज्या प्रवाशांनी या कालावधीसाठी आगाऊ आरक्षण केले असेल अशा प्रवाशांकडून प्रवास करतेवेळी आरक्षण तिकीटाचा जुना तिकीट दर व नविन तिकीट दर यातील फरकाचे तिकीट वसूल करण्यात येणार आहे. दि. 21 नोव्हेंबरपासून पुन्हा मुळ प्रती टप्पा दराने (सध्याच्या दराने) भाडे आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.

खाजगी बस सेवा पुरवणार्‍या ट्रॅव्हल्स व टुरीस्ट कंपन्यांच्या तिकीट दराबाबतच्या मनमानीला कंटाळलेल्या प्रवाशांना एसटीचा मार्ग उत्तम ठरणार आहे. तिकीटाच्या दरात वाढ केली असली तरी जादा बस सेवेमुळे एसटी प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सातारा विभागामार्फत पुण्यातील सातारकरांसाठी 4 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 10 मिनीटाला जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली. दि. 4 रोजी सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत स्वारगेटहून सातारा, कराड, फलटणसाठी 10 बस जादा, महाबळेश्वर व वाईसाठी 5 बसेस जादा सोडण्यात येणार आहेत. दि. 5 रोजी स्वारगेटहून सातार्‍याला 25, कराड 20, फलटण 20, महाबळेश्वर व वाईसाठी 5 जादा बस सोडल्या जाणार आहेत. 7 रोजी सातारा 20, कराड 10, फलटण 10, महाबळेश्वर व वाईसाठी 5 बसेस सोडल्या जाणार आहेत. दि. 10 नोव्हेंबरपासून परतीच्या प्रवासासाठी जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. स्वारगेटला जाण्यासाठी सातारा 25, कराड 10, फलटण 10, महाबळेश्वर व वाई येथून प्रत्येक 5 बसेस सोडल्या जाणार आहेत. दि. 11 रोजी सातारा 30, कराड 15, फलटण 15, महाबळेश्वर व वाई येथून 10 बस, दि. 12 रोजी सातर्‍यातून स्वारगेटला जाण्यासाठी 10 जादा बस उपलब्ध करण्यात येणार आहेत. दि. 5 रोजी मुंबई येथून सातारा येण्यासाठी 20 बस जादा सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी जादा एसटी बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन सागर पळसुले यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget