Breaking News

स्वच्छता अभियान राबविणार्‍या पंचायत समितीलाच अस्वच्छतेचे ग्रहण


किनगाव राजा,(प्रतिनिधी): मातृतीर्थ सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतीची हागणदारीमुक्ती कडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झालेल्या आहेत. स्वच्छता या विषयात तालुक्यामध्ये गाजावाजाही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यासाठी पंचायत समितीचा पुढाकार असताना खुद्द पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहांची मात्र दुरावस्था झालेली पाहायला मिळते. ही दयनीय आवस्था पाहून दिव्याखालीच अंधार असल्याचा प्रत्येय येथे येणार्‍या नागरिकांना येतो. मातृतीर्थ सिंदखेड राजा हे जिजाऊंचे माहेर घर आहे. मात्र याच सिंदखेड राजा पंचायत समितीमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबना होताना दिसत आहे.तालुक्यामध्ये स्वच्छता पंधरवडा मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला परंतु पंचायत समिती आवारामध्ये स्वच्छतागृह असून सुद्धा त्याची दयनीय अवस्था झाली आहे. 

स्वच्छता पंधरवडामध्ये स्वच्छतागृहाकडे लक्ष देऊन त्याची साफसफाई केली असती तर स्वच्छता पंधरवडा खर्‍या अर्थाने साजरा झाला असता, परंतु याकडे गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे स्वच्छतागृहाची दैनी अवस्था पाहायला मिळत आहे. पशुवैद्यकीय कार्यालयाच्या जवळ असलेल्या स्वच्छतागृह कुलूप बंद पहायला मिळते. पंचायत समिती आवारातील बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाची ही अवस्था दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहाच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. असे असतांना सुद्धा पंचायत समिती कडून स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणावर तालुक्यांमध्ये राबवले जात आहे. पंचायत समिती कार्यालयांमध्ये बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था फारच खराब झाली आहे. या स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड दुर्गंधी येते. अनेक वर्षांपासून तेथे स्वच्छता करण्यात आलेली नाही त्यामध्ये पाय ठेवण्यासाठी जागा नाही. टॉयलेट मध्ये घाणच घाण आहे. नेहमी नागरिकांना व कर्मचार्‍यांना उघड्यावरचा आडोसा घ्यावा लागत आहे. पंचायत समिती आवारामध्ये असलेल्या घाणीच्या साम्राज्यकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गटविकास अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.