भाजप पुन्हा नापास; काँग्रेस-जेडीएसला यश; कर्नाटकातील पोटनिवडणुकीत भाजपला अवघी एकच जागा


बेंगळुरू ः कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभेच्या तीनपैकी दोन जागा काँग्रेस-जेडीएसने जिंकल्या, तर विधानसभेच्या दोन्हीही जागा याच आघाडीला मिळाल्या. पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर हे निकाल काँग्रेसला उभारी देणारे आहेत, तर भाजपची लोकप्रियता घटत चालल्याचे निदर्शक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला दक्षिण दिग्विजयाचे स्वप्न पूर्ण करता येणे अवघड आहे, असा कौल तेथील जनतेने दिला आहे.

लोकसभेच्या तीनपैकी दोन जागा काँग्रेस-जेडीएसने तर भाजपला शिमोगा या एकमेव लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला. विधानसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस-जेडीएस आघाडीने जिंकल्या. या निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे काँग्रेस-जेडीएसने चारही जागा मोठया मताधिक्क्याने जिंकल्या आहेत. बल्लारीमध्ये काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा यांनी भाजपच्या जे.शांता यांच्यावर तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. 2004 पासून ही जागा भाजपकडे होती. खाणसम्राट रेड्डी बंधूंचे विश्‍वासू सहकारी श्रीरामुलू यांची बल्लारीवरील पकड संपत चालल्याचे हे लक्षण आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपला इथे मोठा फटका बसला होता. मांडया लोकसभा मतदारसंघातून शिवराम गौडा यांनी सोपा विजय मिळवला. काँग्रेस-जेडीएसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. सिद्धारामय्या यांनी दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. वोक्कालिगांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात इतकी मते मिळवणे ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. शिवामोगामध्ये माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे चिरंजीव बी.वाय.राघवेंद्र यांनी जागा कायम राखली. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे इथे निवडणूक झाली. त्यांनी जेडीएस उमेदवार मधु बंगरप्पा यांचा 50 हजार मतांनी पराभव केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget