Breaking News

शेत मजुराचा मालकावर चाकू हल्ला.


बीड, (प्रतिनिधी):- शहरापासुन पाच किमी अंतरावर असलेल्या वासनवाडी शिवाराजवळील गोरेवस्ती येथे दि. ९ रोजी सहा वाजण्याच्या दरम्यान एका ५२ वर्षीय व्यक्तीवर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली असुन सदर प्रकरणात व्यक्ती गंभीर असुन ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

वासनवाडी शिवाराजवळील गोरे वस्ती येथे बाबासाहेब दौला आंधळे (वय ५२, रा.कानेवाडी) हे मोटारसायकलवर गोरेवस्ती ईदगाहजवळ जात असतांना आरोपी दिपक सुभाष थोरात (वय ४०, रा.एकदुनी ता.पाचोड) हा आला. दिपक यास पाहताच आंधळे यांनी त्याला विचारले कामावर का येत नाहीस? याचाच राग थोरात यास आला. स्वत: जवळील चाकूने आंधळे यांना पोटात सपासप वार करत गंभीर जखमी करत तेथून पळ काढला. थोरात हा आंधळे यांच्याकडे कामावर होता. गेल्या अनेक दिवसापासुन तो कामावर न आल्याने आंधळे त्यास शोधण्यास वासनवाडी शिवारात आले होते. दोघांची समोरा-समोर भेट होताच थोरात याने मागचा पुढचा विचार न करता आंधळे यांच्यावर हल्ला चढवला. याप्रकरणी आंधळे गंभीर असुन ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३०७, ५०४, ५०६ भादवी ४/२५ आर्म ऍक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोउपनि.सोनवणे हे करत आहेत.