Breaking News

जीएसटीमुळे केंद्र सरकारची तिजोरी फुल्ल; एक लाख कोटी जमा


नवी दिल्लीः ऑक्टोबर महिन्यांत वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः याबाबत ट्विट केले आहे. सरकारच्या अपेक्षेप्रमाणे हे उत्पन्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यानंतरच्या सहामाहीत जीएसटीची ही मिळकत पुन्हा एकदा एक लाख कोटींहून अधिक झाली आहे. मे पासून ऑगस्टपर्यंत ही मिळकत 90 कोटींपेक्षा अधिक होती.

जेटली म्हणाले, की इतका चांगला महसूल मिळण्यामागील मोठे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे हेच आहे. या सकारात्मक उपाय योजनांमुळे हे यश सरकारला मिळाले आहे. सरकारी तिजोरीतील ऑगस्टमधील जीएसटीची मिळकत 93 हजार 690 कोटी रुपये होती. 

या आठवड्यात सरकारला अर्थव्यवस्थेसंदर्भात दोन चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे उद्योग सुलभतेत भारताच्या क्रमवारीत 50 स्थानांनी सुधारणा होऊन भारत 77 व्या क्रमांकावर पोहोचला. तर दुसरी बाब म्हणजे जीएसटीच्या महसुलात झालेली विक्रमी वाढ. जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आले, त्या वेळी भारताचा उद्योग सुलभतेबाबत 142वा क्रमांक होता. त्यानंतर पंतप्रधानांनी पुढील वर्षात भारताचे टॉपच्या 50 देशांच्या खास यादीत स्थान मिळवायचे लक्ष्य ठेवले होते.