Breaking News

लेखी आश्‍वासनानंतर सुटले ’युवा स्वाभिमानी’चे उपोषण


बुलडाणा,(प्रतिनिधी): वृद्ध कलावंत मानधन समिती गठीत करून वृद्ध कलावंतांना तत्काळ मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष ईश्‍वरसिंग चंदेल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते.

दरम्यान 3 नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकार्‍यांनी उपोषण मंडपाला भेट देवून चर्चा केली. त्यानंतर लेखी आश्‍वासन देवून या आंदोलनाची सांगता करण्यात आली. वृद्ध कलावंतांच्या मागण्यांची युवा स्वाभिमानीने दखल घेवून जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी मागण्या निवेदने दिली. परंतु प्रश्‍न मार्गी न लागल्याने अखेर युवा स्वाभिमानीने 2 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील शेकडो वृद्ध कलावंतासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन सुरु केले. यादरम्यान कलावंतांनी भजन, कीर्तन आदि कला सादर करून बुलडाणेकरांचे लक्ष वेधले होते. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची अक्षरशः झोप उडवली. या आंदोलनाला विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवल्याने आंदोलन चिघळण्याचे चित्र निर्माण झाले. या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाचे प्रमुख झगडे, नायब तहसीलदार खरे, जि.प.समाज कल्याणचे खरे, गवई यांनी उपोषण मंडपाला भेट देवून चर्चा केली. चर्चेत 15 दिवसात समिती गठीत न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष चंदेल यांनी दिला.