Breaking News

कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चांना उधाण; येदियुरप्पा-शिवाकुमार भेट


बेंगळुरूः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बी.एस.येदियुरप्पा यांनी काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवाकुमार यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिवाकुमार भाजपमध्ये प्रवेश करणार? कर्नाटकात सत्ता बदल होणार का? अशा विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. येदियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय.राघवेंद्रही या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत होता.
शिवाकुमार यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट राजकीय सत्ता समीकरणांसंदर्भात नव्हती, तर शिवामोगामध्ये प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राघवेंद्र शिवामोगामधून खासदार आहेत, तर शिवाकुमार कर्नाटक सरकारमध्ये जलसिंचन मंत्री आहेत. दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही राजकीय भेट असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शिवामोगामधील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असे येदियुरप्पा यांनी या बैठकीनंतर सांगितले. सिंचन प्रकल्पासाठी आपण दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असे राघवेंद्र यांनी सांगितले. वन खाते, सिंचन खात्याच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाले. त्यामुळे राजकीय चर्चेचा प्रश्‍नच येत नाही, असे त्यांनी सांगितले.