Breaking News

न्यायालयाने लोकभावनेचा आदर न केल्यास आंदोलन; राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा इशारा; धार्मिक राजकारण वाढणार


मुंबई/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुक कालावधी मावळतीच्या दिशेकडे धुकला आहे. त्यामुळे राम मंदिराचा प्रश्‍न पुन्हा संघाने निडणुकीच्या अजेंड्यावर आणले आहे. केंद्रात एकहाती सत्ता असलेला पक्ष राम मंदिरासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उभा ठाकला आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद उभा करुन पुन्हा धार्मिक राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. या राजकीय वर्तुळात आता जातीय दंगली उफाळल्या नाही म्हणजे बरे.

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने उचललेल्या कठोर पावलामुळे काही समाजकंटक चिडले आहेत. असे सांगत त्यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. पण राम मंदिराप्रकरणी सुप्रीम कोर्टाने लोकभावनेचा आदर करावा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. राम मंदिराच्या कामाला विलंब होणे ही बाब वेदनादायी असून सुप्रीम कोर्ट योग्य न्याय करेल अशी आशी आहे. भविष्यात आवश्यकता वाटल्यास राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करु, असा इशाराच त्यांनी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीचा मीरा-भाईंदर येथील केशव सृष्टी येथे समारोप झाला. यानंतर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राम मंदिराबाबत ते म्हणाले, राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण प्रकरण न्यायालयात असल्याने विलंब होतोय. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. हा कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा विषय आहे. हिंदूच्या भावनेचा आदर करुन सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यावा. संघाने हिंदुत्वाचे धडे माझ्याकडून घ्यावेत, असे राहुल गांधींनी म्हटले होते. याचाही भय्याजी जोशी यांनी समाचार घेतला. राहुल गांधी यांना किती गांभीर्याने घ्यावे, याचा आपण विचार केला पाहिजे असे म्हणत त्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. जम्मू- काश्मीरमध्ये केंद्र सरकारने उचललेल्या कठोर पावलामुळे काही समाजकंटक चिडले आहेत, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. गेल्या वर्षभरात संघाने देशभरात 13 लाख वृक्षारोपण केले, असा दावाही त्यांनी केला. 


चौकट
...तर 1992 ची उजळणी पुन्हा करु
राम मंदिराप्रश्‍नी पर्याय नसल्यास अध्यादेश आणावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दिवाळीपूर्वी चांगली बातमी येईल अशी आशा होती. पण आता ही सुनावणी थेट पुढील वर्षी होणार असल्याने अपेक्षाभंग झाला. राम मंदिरासाठी आम्ही आंदोलन केले. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काही मर्यादा येतात. पण भविष्यात गरज वाटल्यास राम मंदिरासाठी 1992 सारखे पुन्हा आंदोलन करु
- भय्याजी जोशी 

कोर्ट भावनेच्या आहारी निर्णय घेत नाही
सुप्रीम कोर्ट हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही. राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. हा कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा विषय आहे. हिंदूच्या भावनेचा आदर करुन सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यावा. सुप्रीम कोर्टाने तातडीने या प्रकरणावर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. सुप्रीम कोर्ट हिंदू भावनेच्या आधारे निर्णय घेऊ शकत नाही. ते अजूनही भारताच्या संविधानाला मानायला तयार नाही. संविधानात आस्था, भावनेला स्थान नाही. इथे फक्त न्यायालाच स्थान आहे.
खा. असदुद्दीन ओवेसी (एमआयएम)

तर मोदी सरकार का पाडत नाही?
शिवसेनेमुळेच गेल्या चार वर्षांपासून बासनात गुंडाळलेल्या राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. संघालाही आंदोलनाची गरज वाटत असेल तर तुम्ही हे सरकार खाली का खेचत नाही. राम मंदिर होत नाही तर मोदी सरकार का पाडत नाही? असा शिवसेनेचा सवाल आहे. 
-उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)