Breaking News

दौलतनगर येथे संगीताच्या मैफलीत रंगली ‘राज’किय दिवाळी


पाटण (राजेंद्र लोंढे) : संगीताचे सुमधुर स्वर..... गायक गायिकांच्या कर्णमधुर आवाजामुळे सजलेली मैफिल...मनाचा ठाव घेणारे वादन... रंगीबेरंगी दिव्यांची झगमगाट...आणि संगीतमय तालावरचा ’दिवाळी फराळ !’ तोही स्वतः आमदार देसाई व जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, पत्रकार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या समवेत....! असा अनोखा मिलाफ दौलतनगर (ता. पाटण) येथे सोमवारी सायंकाळी अनुभवायला मिळाला.
खाऊ दिवाळी, लेवू दिवाळी आणि सजवू दिवाळी या उद्देशातून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी सोमवारी त्यांच्या दौलतनगर येथील निवासस्थानी दिवाळी फराळ आणि स्वरांगण हा मराठी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या अनोख्या कार्यक्रमासाठी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल तसेच जिल्हयातील शासकिय अधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी दिवाळी हा सण आपल्या कुटुंबासमवेत कधी जिल्हा बाहेर तर कधी राज्य आणि देशाच्या बाहेर ही साजरा करतात. मात्र, पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी गेल्या चार वर्षापासून आपल्या पाटण विधानसभा मतदार संघातील शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत दिवाळी फराळ या नावाने ’दिवाळी’ हा सण साजरा करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.आमदार देसाई यांच्या या अनोख्या सामाजिक कार्यक्रमाला यावर्षी विविध शासकीय अधिकार्‍यांसमवेत दस्तुखुद्द जिल्हाधिकारीही आवर्जून उपस्थित राहून आमदार देसाई यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सोमवारी सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत त्यांच्या दौलतनगर (ता. पाटण) येथील निवासस्थानी दिवाळी फराळ या अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आमदार देसाई यांच्यासहीत त्यांच्या कुटुंंबातील आमदार देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई, बंधू रविराज देसाई, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, निवासी जिल्हाधिकारी, ऍडीशनल एस. पी. धैर्यशील पाटील, पाटणचे डीवायएसपी अंगद जाधवर कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सातारा प्रांताधिकारी स्वाती देशमुख, कराडचे प्रांताधिकारी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले, नायब तहसीलदार राजेंद्र तांबे,यांच्यासाहित शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पत्रकार आणि तालुक्याच्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन, आणि सामान्य जनता यांचा अनोखा संगम या दिवाळीच्या फराळ कार्यक्रमातून पाहवयास मिळाला.
आमदार देसाई स्वतः सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून प्रत्येक टेबल जवळ जाऊन फराळ मिळाला की नाही ,’बरेच दिवस दिसला नाही’,’ कसे चालले आहे’, अशी हक्काने विचारपूस करताना कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारीही भारावून जाताना दिसत होते.
दरम्यान, तब्बल तीन तास सुरु असलेल्या या मैफिलीत आणखी रंग भरला तो प्रा. सुरेश शुक्ल निर्मित मधुर स्वरांगण हा मराठी गाण्यांचा कार्यक्रमाने. या कार्यक्रमात अनेक मराठी गीतांबरोबर हिंदी बहारदार गीतांनी ही मैफिल अधिकच रंगदार झाली. त्यामुळे संगीताच्या ठेक्यावर फराळाचा आनंद द्विगुणित झाला.
या कार्यक्रमात आमदार देसाई यांनी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वांसोबत खाऊ दिवाळी, लेवू दिवाळी, सजवू दिवाळी अशा अनोख्या पध्दतीने साजरी केलेल्या या अनोख्या दिवाळी फराळ सायंकाळ या उत्सवाची जिल्ह्याच्या राजकारणात खुमासदारपणे चर्चा आहे.
यावेळी आमदार देसाई म्हणाले, वर्षभर लोकप्रतिनिधी प्रशासन आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये केवळ विकासकामे यांच्या माध्यमातून संपर्क असतो मात्र लोकप्रतिनिधी, शासकीय वरिष्ठ अधिकारी,सामान्य नागरिक यांच्यामध्ये कोणत्याही ताण तणावाशिवाय, कामाशिवाय एक मंगलमय बैठक... आस्थेवाईक पणे आणि आदराने विचारांची देवाण घेवाण घडण्यासाठी.....एक अनोखा संगम.....या उद्देशाने दिवाळी फराळाची कल्पना पुढे आली आणि गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरु आहे आणि यापुढे ही असाच सुरु राहावा अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार देसाई यांनी शेवटी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.