Breaking News

नक्षलवाद्यांचा प्रश्‍न केवळ चर्चेने सुटेल; नक्षलवाद्यांची तुलना क्रांतिकारकांशी ; राज बब्बर यांचे मत


रायपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांची तुलना क्रांतिकारकांशी केली आहे. छत्तीसगड दौर्‍यावेळी राज्यातील नक्षलवाद्यांच्या स्थितीवर बोलताना बब्बर यांनी हे विधान केले. बंदुकीच्या धाकाने नव्हे तर चर्चेच्या मार्गाने प्रश्‍न सुटू शकतात, असे बब्बर यांनी म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बब्बर यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना बब्बर यांनी निर्णय हे बंदुकीच्या सहाय्याने घेतले जाऊ शकत नाही. नक्षलवाद्यांचे प्रश्‍न आपल्याला समजावून घ्यायलाच हवे ही भूमिका पक्षासमोर मांडल्याचे बब्बर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

दंतेवाडा येथील नक्षली हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला. तर दोन जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. नक्षलवादी हल्ल्यांचा मुद्दा जोर धरत असतानाच रायपूरमध्ये आलेल्या राज बब्बर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ज्या लोकांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत, त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो, काही लोक त्यांचे अधिकार हिसकावून घेतात. त्यामुळे या लोकांना बलिदान द्यावे लागते,’ असे बब्बर म्हणाले. ते चुकीचे करत आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या बंदुकीने तोडगा निघणार नाही. संवादानेच मार्ग निघेल. बंदुकीने प्रश्‍न सुटणार नाहीत. क्रांतीसाठी निघालेल्या लोकांना भीती दाखवून किंवा प्रलोभने देऊन रोखता येणार नाही. नक्षल्यांचे आदोलन अधिकारांसाठी सुरू झाले. त्यांचे प्रश्‍न समजून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधायला हवा,’ असेही ते म्हणाले.

नक्षलवाद्यांना दिशा द्या : 
नक्षलवादी चळवळ अधिकारांसाठी सुरू झाली होती. त्यामुळे त्यांना अधिकार प्राप्त करून द्यायचे असतील. तर त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी. काही लोक मार्ग भरकटले आहेत. त्यांना मूळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही एका प्रश्‍वाला उत्तर देताना बब्बर म्हणाले.