Breaking News

निवडणुकीच्या काळात मिझोराममध्ये तणाव; लाठीमारात दहा जखमी

ऐझावाल - मिझोरम विधानसभा निवडणुकीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना हटवण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यासाठी कोलासिंब जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाला विरोधकांकडून घेराव घालण्यात आला. निवडणुकीच्या काळातच विरोधकांनी निवडणूक यादीतून नाव हटवण्याची मागणी केल्याने निवडणूक आयोगाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वेळी उपायुक्त कार्यालयाजवळ विरोधकांनी गर्दी केल्यामुळे या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात कमीत कमी 10 लोक जखमी झाले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या हटवण्याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाचे तीन सदस्य आणि एका स्वयंसेवी संसथेच्या कार्यकर्त्यांत बैठक घेण्यात आली होती. तीन तास चाललेल्या या बैठकीतून काहीही तोडगा न निघाल्याने संतप्त विरोधकांनी उपायुक्त कार्यालयावर धडक दिल्यामुळे त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय माजी आयोग समितीकडून घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
देशातील पाच राज्यांमध्ये लागलेल्या विधानसभा निवडणुकांपैकी मिझोरममध्ये येत्या 28 नोव्हेंबरला निवडणुका होणार असून राज्यातील एकूण 40 जागांसाठी ही लढत असणार आहे. मिझोरम राज्यात एकूण 7 लाख 2 हजार 120हून अधिक मतदारांची संख्या आहे. आत्तापर्यंत या राज्यात काँग्रेस आणि मिझोरम नॅशनल फ्रंट पक्ष असं युतीचं सरकार होतं. मात्र यंदा भारतीय जनता पक्ष या निवडणुकांमध्ये सरस ठरेल का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्याच्या निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे.