Breaking News

ट्रम्प यांचा पक्ष पराभूत खालच्या सभागृहात आठ वर्षांनंतर डेमॉक्रटिकला बहुमत

न्यूयार्क ः अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. आठ वर्षांनंतर डेमॉक्रॅटिक पक्षाला खालच्या सभागृहात बहुमत मिळाले आहे. अर्थात, सेनेटवरील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण कायम आहे. दरम्यान, सव्वा वर्षांनंतर अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीवर त्याचा कितपत परिणाम होईल, हे पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

रिपब्लिकन पक्षाने इंडियाना, टेक्सास आणि उत्तर डाकोटा या सिनेटच्या जागा जिंकल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाने हाऊसमध्ये 19 जागांची आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडील एकूण जागा आता 21 झाल्या आहेत. आठ वर्षांत प्रथमच कॉँग्रेसच्या खालच्या सभागृहात डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आता ट्रम्प यांचा अजेंडा रोखणे शक्य होणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात मध्यावधी निवडणुकांचा कौल जाणे हा ऐतिहासिक कल पुन्हा परतल्याचे मानले जात आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नॅन्सी पेलोसी या सदनाच्या स्पीकर होतील. त्यांनी यापूर्वी 2007 ते 2011 या काळात हे पद भूषवले आहे.
रिपब्लिकन पक्षाने 51 जागांसह सेनेटमधली आघाडी कायम राखली आहे.
हाऊसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षानं 218 जागा जिंकून हाऊसचे नियंत्रण मिळवले आहे.
रिपब्लिकन पक्षाकडून सहा गर्व्हनरपदे ताब्यात घेतली असून तिथेही तूर्तास आघाडी घेतली आहे. ट्रम्प यांनी सेनेटमधील विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांचे कौतुक करणारे एक ट्वीवटही केले आहे. 105 वर्षांत केवळ पाचव्यांदाच विद्यमान अध्यक्षांना सेनेटमधले स्थान राखता आलं आहे.
अलेक्झांड्रिया अकॉसिओ-कोर्टझ आणि अ‍ॅबी फिंकेनॉवर या दोन्ही 29 वर्षांच्या सर्वांत तरुण प्रतिनिधी हाऊसमध्ये निवडून आल्या आहेत. दोघीही डेमॉक्रॅटिक पक्षाच्या आहेत. अलेक्झांड्रिया न्यूयॉर्क-13 डिस्ट्रिक्टमधून तर अ‍ॅबी या आयोवा - फर्स्ट डिस्ट्रिक्टमधून निवडून आल्या आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार, हाऊसमध्ये एकूण 89 महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. यापूर्वी महिला प्रतिनिधींचा आकडा 84पर्यंत गेला होता. डेमॉक्रॅटिक पक्षाकडून इल्हान उमर आणि रशिदा तालिब या दोन मुस्लिम महिलाही प्रथमच निवडून आल्या आहेत. इंडियानाच्या जागेवर डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव झाला आहे. हा डेमॉक्रॅटिक पक्षासाठी मोठाच धक्का मानला जात आहे.
.