Breaking News

राष्ट्रवादी, काँग्रेसला प्रत्येकी वीस जागा; मित्रपक्षांच्या वाट्याला आठ जागा सोडण्याची शक्यता


भागा वरखडेनगरः राष्ट्रवादी व काँग्रेस महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रत्येकी वीस जागा वाटून घेण्याची शक्यता आहे. उर्वरित आठ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.
 
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. दोन्ही पक्षांत 38 जागांवर एकमत झाल्याचे समजते. मागच्या वेळी काँग्रेसने 27 तर राष्ट्रवादीने 21 जागा लढविल्या होत्या. महाराष्ट्रातून काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. विधानसभेत राष्ट्रवादीचे 41 तर काँग्रेसचे 42 आमदार आहेत. त्यातही नीलेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेस सोडल्यात जमा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा जोर वाढल्याचा दावा केला जातो. स्थिा्नक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळविल्या. त्यामुळे तर राष्ट्रवादीने लोकसभेच्या निम्म्या जागांवर दावा केला आहे. काँग्रेस तेवढ्या जागा सोडायला तयार नाही. असे असले, तरी सध्या शरद पवार यांनी भाजपविरोधात देशपातळीवर आघाडी उघडली असून तिचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. फारूक अब्दुला, मुलायमसिंह यादव, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा, मायावती, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन यांच्यांशी पवार यांचे चांगले संबंध आहेत. राहुल गांधी यांच्यांशी त्यांचे सूर जुळले आहेत. 

दोन्ही काँग्रेसने परस्परांत प्रत्येकी वीस जागा वाटून घ्याव्यात, असा चर्चेचा सूर आहे. काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीने पुण्याची जागा पदरात पाडून घ्यावी, असा आग्रह धरला असला, तरी शरद पवार यांनी मात्र बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी लढत असल्याने पुण्यासाठी आग्रही असू नये, असे खडसावले आहे. तेथे जुने सहकारी सुरेश कलमाडी यांना पवार मदत करण्याची शक्यता आहे. पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडली जाण्याची शक्यता आहे. ड. प्रकाश आंबेडकर यांनी एमएमआय या पक्षाशी केलेली युती काँग्रेसला रुचलेली नाही; परंतु अजित पवार यांचे वक्तव्य पाहता या दोन्हींना प्रत्येकी एक-एक जागा सोडली जाण्याची शक्यता आहे. अकोल्याची जागा आंबेडकरांना तसेच विदर्भातील एक जागा मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला, नॅशनल रिपब्लीकन या नव्या पक्षाला शिर्डीची जागा, मावळची जागा शेकापला, मुंबईतील एखादी जागा समाजवादी पक्षाला सोडली जाण्याची शक्यता आहे.