Breaking News

दुष्काळात तेरावा,एन दिवाळीत घर फोडी

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील सहयोग नगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन कपाटातील दागिने आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ऐन दिवाळीत चोरट्यांनी डोके वर काढले असुन शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बीड शहरातील सहयोग नगर भागातील संध्या सुरेश जोशी (वय ५०) या घरात एकट्या होत्या. पहाटेच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करुन कपाटात ठेवलेले मंगळसुत्र, सोन्याची अंगठी व २५ हजार रुपयांची रोकड असा एकुण ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती कळताच शहर ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. 
या प्रकरणी संध्या जोशी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय जाधव हे करीत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीतच चोरट्यांनी डोके वर काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासुन चोरीचे प्रकार थांबले होते. 
मात्र सणासुदीच्या काळातच पुन्हा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होवू लागली आहे.