Breaking News

शिवराजसिंह चौहानांच्या मेव्हण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश


भोपाळः मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवराजसिंह चौहान यांचे मेव्हणे संजय सिंह मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मसानी हे मुख्यमंत्री चौहान यांच्या पत्नी साधना सिंह यांचे भाऊ आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि प्रचार समितीचे प्रमूख ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशमध्ये नाथ हवेत, शिवराज नको, असे संजय यांनी दिल्लीत बोलताना म्हटले आहे. त्यांनी भाजपवर घराणेशाही राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात 28 नोव्हेंबर रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच 177 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर लगेच भाजपला धक्का देत चौहान यांचे मेव्हणे विरोधकांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.