नेवासा येथे दोन दिवसीय इज्जतेमाची उत्साहात सांगता; लाखभर भाविकांच्या उपस्थितीत नमाज व दुवा अदा


नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा येथील काझीनगरच्या प्रांगणात झालेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय इज्जतेमाची सामुदायिक विवाह सोहळ्यासह नमाज व दुवा अदा करून लाखभर भाविकांच्या उपस्थितीत  उत्साहात सांगता करण्यात आली.

यावेळी देशाची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी व देशाला उन्नतीकडे नेण्याकरिता अल्लाहतालाकडे दुआद्वारे प्रार्थना करण्यात आली.

या दोन दिवसाच्या इज्जतेमाला भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवानेते प्रशांत गडाख, राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील,शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार,त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे प्रमुख साहेबराव घाडगे पाटील,कडूभाऊ काळे, काँग्रेस कमिटीचे तालुका शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी भेटी देऊन कार्यक्रमाची माहिती घेतली.

इज्जतेमाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.2) सुमारे 70 हजार भाविकांनी येथे हजेरी लावली. तर शनिवारी (दि.3) शेवटचा दिवस असल्याने यादिवशी सकाळी फजरची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मालेगाव येथील मौलाना हाजी लाईक यांनी बयान पेश केला तर दुपारी 1.30 वाजता जोहर नमाज व त्यानंतर असर नमाज झाली मुब्रा येथील मौलाना शोएब यांच्या बयान नंतर जिल्ह्यातील आलेल्या वीस जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 

मगरीबची नमाज शनिवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. नांदेड येथील मौलाना साद अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या या नमाजसाठी हजारो भाविकांचा जनसागर लोटला होता. काझीनगरच्या प्रांगणातील मंडपाबाहेर बसून भाविकांनी नमाज अदा केली. इज्जतेमाची सांगता जमाते तबलीकचे महाराष्ट्र प्रमुख मौलाना हाफिज मंजूर साब यांच्या उपस्थितीत झाली. 

दोन दिवसीय इज्जतेमा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी नेवासा येथील मुस्लिम समाजातील सुमारे दोनशे युवा कार्यकर्ते स्वयंसेवक एक महिन्यापासून अधिक मेहनत घेताना दिसत होते. या इज्जतेमा करीता सर्वधर्मीय बांधवांनी देखील खारीचा वाटा उचलून योगदान दिले. 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. इज्जतेमासाठी योगदान देणार्‍या सर्वांचे संयोजन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget