ग्रेड सेपरेटरच्या कामात भुयारी जलमार्गाची मालिका


गुरुदास अडागळे
सातारा : पोवई नाक्यावर सुरू असणा-या ग्रेड सेपरेटरच्या कामात भुयारी जलमार्ग आढळले. या वृत्ताने सातारा शहराला असलेल्या ऐतिहासिक वारशाला मोठा उजाळा मिळाला होता. याच ग्रेड सेपरेटरच्या सुरू असलेल्या कामात आता सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील भुयारी जलमार्गाची एक मालिकाच असल्याचे उघड झाले आहे. 


महाराजा सयाजीराव महाविद्यालयासमोर एक आणि इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर एक असे एकूण दोन नवीन भुयारी जलमार्ग आढळले आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून राजपथ असलेल्या या रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची ही व्यवस्था काळाच्या पडद्याआड जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू असलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या शाहूनगरीत पूर्वेचे प्रवेशद्वार असलेला हा रस्ता आजही राजपथ म्हणूनच ओळखला जातो. आज ज्याठिकाणी गुरुवार बाग आहे, त्याठिकाणी असलेल्या तख्ताच्या वाड्यात छत्रपती शाहू महाराजांचे वास्तव्य होते. त्यामुळे मोहिमेवर निघण्यासाठी अथवा शिलांगणाचे सोने लुटण्यासाठी वेशीवर येणार्यासाठी किंवा छत्रपतींच्या भेटीसाठी येणा-या सरदारांचा हाच मुख्य रस्ता होता. या रस्त्याला लागूनच असलेल्या चारभिंतीच्या डोंगरावरुन येणारे पावसाचे प्रचंड पाणी वाहून जाण्यासाठी हा जमिनीखालील भुयारी जलमार्ग बांधला असावा. 

याआधी सातारा येथील पोवई नाक्यावरील आयडीबीआय बँकेसमोर आढळलेल्या भुयारी जलमार्गापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर म्हणजेच सयाजीराव शाळेसमोर आणि या ठिकाणाहून सुमारे 100 ते 125 मीटर अंतरावरील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर आढळलेले हे बंदिस्त जलमार्ग हे पावसाळ्यात राजमार्गावरील तत्कालीन वाहतूक विनाअडथळा सुरळीत व्हावी, यासाठीच केलेली व्यवस्था आहे. आयडीबीआय बँकेसमोर असलेल्या भुयारी जलमार्गाच्या बांधकामामध्ये आणि या दोन्ही ठिकाणी असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामामध्ये साम्य आहे. कारण ही बांधकामे समकालीन आहेत. ही बांधकामे चुन्यामध्ये केलेली आहेत. विशेष म्हणजे चारभिंतीकडील बाजूच्या बांधकामाला दगडी कमान आहे. तशी कमान उत्तरेच्या बाजूला असलेल्या बांधकामात नाही. इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या समोरील भुयारी जलमार्गाच्या आतील भागाची पाहणी केली असता दगडी बांधकाम दिसत आहे. दरम्यान, याच मार्गावर सायली हॉटेलसमोरही असाच भुयारी जलमार्ग असण्याची दाट शक्यता आहे. या भुयारी जलमार्गांचे दुसरे टोक उत्तरेच्या दिशेने जाणार्या ओढ्यात उघडले जात होते. या भुयारी जलमार्गाच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केल्यास चारभिंतीकडून येणारे पावसाचे पाणी इतरत्र पसरु नये, तसेच राजमार्गही सुस्थितीत राहावा यासाठीच हा जलमार्ग बंदिस्त केला असावा. 

ठेवा काळाच्या पडद्याआडशहराच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी होत असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे हा शाहूकालीन ऐतिहासिक ठेवा पुन्हा पाहण्यासाठी मिळत असला, तरी दुर्देवाने तो कायमचाच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. 
.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget