Breaking News

मध्यरात्री फटाके फोडणार्‍या दोन तरुणांवर गुन्हे


मुंबई (प्रतिनिधी)ः फटाके फोडण्याची वेळ न पाळणे दोन जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. मध्यरात्री फटाके फोडले, म्हणून पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. फटाके वाजविणार्‍यांचा शोध घेतला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा यावेळेत फटाके फोडावेत, त्यावर स्थानिक प्रशासानाने नजर ठेवावी, असे निर्देश नुकतेच दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करता यावी, म्हणून राज्यभर पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत; मात्र तरीही मंगळवारी ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडले. मध्यरात्री हे फटाके फोडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फटाके फोडण्याची वेळ न पाळल्याने गुन्हा दाखल दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

न्यायालयाने दिवाळीत रात्री 8 ते 10 दरम्यान फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय नाताळ आणि नववर्षाच्या दिवशी रात्री 11.45 ते 12.15च्या दरम्यानच फटाके फोडण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. न्यायालयाने ई-कॉमर्स पोर्टल्सला फटाके विकण्यास मज्जावही केला होता.