Breaking News

इम्रान खान मागताहेत चीनमध्ये भीक! सरकारी वाहिनीचा पाकच्या सरकारला घरचा आहेर


इस्लामाबाद ः कधीकधी वृत्तवाहिन्याही बातम्यांमध्ये व्याकरणाच्या चुका करताना दिसतात. अशाच एका व्याकरणाच्या चुकीमुळे सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानमधील सरकारी वाहिनी असणारी पीटीव्ही वृत्तवाहिनी ट्रोल होते आहे. सध्या चीन दौर्‍यावर असलेले इम्रान खान हे चीनची राजधानी बीजिंगमध्ये आहेत. इम्रान यांचा सहभाग असलेल्या येथील एका कार्यक्रमाचे प्रक्षेपण करताना पीटीव्हीने आपल्या डेटलाइनमध्ये बीजिंगऐवजी चक्क बेगिंग म्हणजेच भीक मागणे असे लिहिले. विशेष म्हणजे टीव्ही स्क्रीनच्या डाव्या कोपर्‍यात बेगिंग असा शब्द दिसत असतानाच इम्रान खान भाषण देत होते. म्हणजेच इम्रान खान भीक मागत होते, असाच अर्थ या वृत्तांकनामधून सूचित होत आहे.

सध्या या भाषणाचा बेगिंग असा उल्लेख असणारा स्क्रीनशॉर्ट तसेच काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर पीटीव्हीने ट्विटवरून बीजिंगऐवजी बेगिंग हे चुकून लिहिले गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये पीटीव्हीने ती लिहिताना झालेली चूक होती. शहराचे चुकलेले नाव 20 सेकंदांसाठी स्क्रीनवर होते आणि नंतर ते काढून टाकण्यात आले. याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो. याप्रकरणासाठी जबाबदार असणार्‍या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही पीटीव्हीन म्हटले आहे. तर पाकिस्तान मीडिया वॉच या ट्विटवर अकाऊण्टवरील ट्विटनुसार या प्रकरणात दोन कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले असून इतर दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना इम्रान खान हे मित्र देशांकडून कर्ज मागण्याच्या उद्देशाने परदेश दौरे करत असतानाच हा प्रकार घडला आहे. आधी सौदी अरेबियाचा दौरा करुन आलेले इम्रान हे चार दिवसांच्या चीन दौर्‍यावर आहेत. दोन्ही मित्र देशांकडे त्यांनी कर्जासंदर्भातील अटी आणि तरतुदींबद्दल चर्चा केल्याचे समजते.

या सर्व प्रकरणानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पीटीव्हीचे कार्यकारी व्यवस्थापक अर्शद खान यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतीय नेटकर्‍यांबरोबर पाकिस्तानमधील ट्विटर युझर्सही इम्रान खान आणि पीटीव्हीला ट्रोल करताना दिसत आहेत.