Breaking News

गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी युवकास अटक


शेंद्रे (प्रतिनिधी) : पाटण येथील चौकीचा आंबा चौकात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी साहिल रुस्तम शिकलगार (वय 21, रा. नागठाणे) या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा (सिंगल बार) आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. ही कारवाई शनिवारी पहाटे 1.30 वा.च्या सुमारास करण्यात आली. 

याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप भोसले यांना तारळे येथे एक युवक गावठी कट्टा घेऊन येणार असलेची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उंब्रज पोलिसांनी तातडीने तारळे येथे सापळा रचला. रात्री 1.30 च्या सुमारास तारळे येथील अंबा चौकात अंधारातून येणार्‍या युवकाचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यास चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता हा युवक पळू लागला. मात्र, त्यास मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतुसे सापडली. बेकायदा गावठी कट्टा जवळ बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच चारशे रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लक्ष्मण जगधने यांच्या सहकार्‍यांनी केली. संशयितावर नागठाणे, बोरगांव याठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.