Breaking News

साकत येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी; रानडुक्करांचा तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी


जामखेड- (प्रतिनिधी) - तालुक्यातील साकत येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. जामखेड ग्रामीण रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (दि.4) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. प्रल्हाद वराट (वय 50), असे जखमीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद हे गुरे चारण्यासाठी शेतात गेले असता 12.30 च्या सुमारास एका जाळीतून दहा ते पंधरा डुक्करांचा कळप उठला व त्याने प्रल्हाद यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यांच्या मांडीला व हनुवटीवर मोठ्या प्रमाणावर जख्म झाली. हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने चक्कर येऊन पडले. शेजारील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे रानडुक्कर तेथून पळाले. नागरिकांनी प्रल्हाद यांना तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. युवराज खराडे यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

साकत व परिसरात मागील अनेक दिवसांपासून रानडुक्करांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती आहे. रानडुक्करे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. आता तर थेट जीवघेणा हल्ला करीत आहेत. रानडुक्करांचा असाच हल्ला दोन महिन्यांपूर्वी गुरे चारण्यासाठी गेलेल्या सोजरबाई वराट यांच्यावरही केला होता. घटनेत त्यांचा खुबा मोडला होता. घटनेनंतर त्यांना अद्यापही जागेवरून हलता येत नाही. रानडुक्करांच्या वारंवार होणा-या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.